Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या सामन्यात भारतीयांची निराशा केली. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन खेळाडूंची आज कांस्यपदकासाठी लढत झाली. त्यात मलेशियाच्या ली झी जिया याने लक्ष्य सेनवर १३-२१, २१-१६, २१-११ अशा तीन गेममध्ये विजय मिळवला. लक्ष्य सेनकडून भारतीयांना चौथ्या कांस्यपदकाची आशा होती. लक्ष्यने सुरुवात दमदारे केली होती, पण नंतर त्याला आपली आक्रमकता टिकवून ठेवणे शक्य झाले नाही. दुखापतीमुळे त्याच्या कोपरातून रक्त येत असूनही त्याने सामना खेळला, पण अखेर पदरी निराशा आली.
पहिला गेम सहज जिंकला!
पहिल्या सेटमध्ये दोनही खेळाडू सुरुवातीला बचावात्मक खेळ करत होते. पण लक्ष्य सेनने हळूहळू प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोघांमधील अंतर खूपच कमी होते. पण त्यानंतर लक्ष्य सेनने झटपट पॉइंट्स कमावत आघाडी वाढवली आणि अखेर २१-१३ असा पहिला गेम जिंकला.
रोमांचक झाला दुसरा गेम
दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने दमदार सुरुवात केली. लक्ष्यने ८-४ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर जिया लीने मागून येऊन सेनला ओव्हरटेक केले. त्याने आधी ८-८ अशी बरोबरी केली. त्यानंतर १२-८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने कमबॅक केले. त्यानेही १२-१२ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघांमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली. पण अखेर ली झी जियाने २१-१६ ने दुसरा गेम जिंकला.
निर्णायक गेममध्ये लक्ष्य सेन हतबल
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये लक्ष्य सेनला काही कळण्याआधीच ली जियाने ९-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर लक्ष्य सेनने काही वेळा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. गेम हळूहळू पुढे गेला पण लक्ष्यला डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही. अखेर मलेशियाच्या ली जियाने २१-११ ने तिसरा गेम जिंकत ब्राँझ मेडल जिंकले.
तत्पूर्वी, काल उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने लक्ष्य सेनला पराभूत केले होते. लक्ष्यने संपूर्ण सामन्यात चमकदार खेळ केला, परंतु छोट्या चुका त्याला महागात पडल्या. त्यामुळेच एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ अशा दोन सरळ गेममध्ये सामना जिंकला.