वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना भारतीय क्रीडा पुरस्करानं (Indian Sports Honours 2024) सन्मानित करण्यात आले आहे. कॉर्नरस्पोर्ट्सच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात ऑलिम्पिक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणारी मनू भाकर, सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारा नीरज चोप्रा, हॉकी संघाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग आणि क्रिकेट जगतातील लोकप्रिय चेहरा असणारी स्मृती मानधना आणि युवा भारतीय बॅटर यशस्वी जैस्वाल या मंडळींचा यात समावेश आहे. इथं एक नजर टाकुयात भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंवर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल कमावणाऱ्या मनू भाकरनं दुसऱ्यांदा मारली बाजी
पॅरिस येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकी निशाणा साधणारी भारताची नेमबाज मनू भाकर हिला वैयक्तिक क्रीडा प्रकारातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. मनू भाकर हिने जगातील मानाच्या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक कांस्यपदक अशी दोन पदके पटकावली होती. याआी २०१९ मध्ये या पुरस्कार सोहळ्यात तिला उदयोन्मुख महिला खेळाडूच्या रुपात सन्मानित करण्यात आले होते.
गोल्डन बॉय नीरजचाही सन्मान
भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राला वैयक्तिक क्रीडा खेळासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या रुपात सन्मानित करण्यात आले. २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले होते.
स्मृती मानधनाही दुसऱ्यांदा ठरली या प्रतिष्ठित पुरस्काराची मानकरी
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकॅप्टन आणि नॅशनल क्रशचा टॅग लागलेली स्मृती मानधना हिला या वर्षातील फलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर सांघिक प्रकारातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. स्मृती मानधनाही दुसऱ्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. याआधी २०१९ मध्ये देखील तिची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
हॉकी संघाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगचाही गौरव
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याची सांघिक प्रकारातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याचा वाटा महत्वाचा होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने या वर्षी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले.
यशस्वी जैस्वालला दोन पुरस्कार
भारतीय क्रिकेट संघातील युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याचाही पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समावेश आहे. या क्रिकेटरनं स्टार स्पोर्ट्स बिलीव्ह ऑनर आणि पॉप्युलर चॉइस ब्रेकथ्रू परफॉर्मन्स ऑफ द इयर या दोन पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
Indian Sports Honours 2024 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
अन्य क्रीडा
- - वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) (वैयक्तिक खेळ) - नीरज चोप्रा
- - वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (महिला) (वैयक्तिक खेळ) - मनू भाकर
- - वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (सांघिक) - हरमनप्रीत सिंग
- - वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) - जसपाल राणा
- - वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला) - सुमा शिरूर
- - वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ (पुरुष) - भारतीय हॉकी संघ
- - वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ (महिला) - बुद्धिबळ
क्रिकेट
- - स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (सांघिक) - स्मृती मानधना
- - स्टार स्पोर्ट्स बिलीव्ह ऑनर - यशस्वी जैस्वाल
- - पॉप्युलर चॉइस ब्रेकथ्रू परफॉर्मन्स ऑफ द इयर (पुरुष) - यशस्वी जैस्वाल
- - पॉप्युलर चॉइस ब्रेकथ्रू परफॉर्मन्स ऑफ द इयर (महिला) - श्रेयंका पाटील
- - वर्षातील लोकप्रिय क्लब - कोलकाता नाइट रायडर्स
पॅरा खेळाडू
- - पॅरा ॲथलीट ऑफ द इयर (पुरुष) - सुमित अंतिल
- - पॅरा ॲथलीट ऑफ द इयर (महिला) - अवनी लेखरा
अन्य क्रीडा
- - एसएसएफ ग्रासरूट्स इनिशिएटिव्ह ऑफ द इयर ऑनर - मृदा एज्युकेशन युनिव्हर्सिटी
- - पॉप्युलर चॉइस फॅन क्लब ऑफ द इयर - मंजप्पाडा (केरळ ब्लास्टर्स)
- - जीवनगौरव सन्मान - पद्मश्री मुरलीकांत पेटकर