Manika Batra Pm Modi National War Memorial: भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा हिने नुकतीच नॅशनल वॉर मेमोरियलला (National War Memorial) भेट दिली. मनिका बत्राने वॉर मेमोरियलला भेट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि ट्विट केले की, मी भारताचे जागतिक स्तरावर एक खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आपल्या देशाला आपला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याचं समाधान काय असतं हे मला नीट माहिती आहे. पण आपले सैनिक आपल्या देशासाठी जी कामगिरी बजावतात त्याचं त्यांना मिळणार समाधान आणि देशवासीयांना वाटणारा गौरव काही औरच असतो. सैनिकांना देशासाठी कार्य करताना वाटणारा अभिमान कितीतरी पटीने अधिक आहे, असं मनिकाने लिहिलं.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे मनिकाचं हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेअर केलं. हे ट्विट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आणि पर्यटकांना नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देण्याचे आवाहन केले. भारताचा अभिमान आणि क्रीडा जगतातील चॅम्पियन मनिका बत्रा हिने नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देण्याचा तिचा अनुभव खूपच चांगला असल्याचं शेअर केलं आहे. मी तुम्हा सर्वांनादेखील या वॉर मेमोरियलला भेट देण्याचं आवाहन करतो, असं पंतप्रधान मोदी यांनी लिहिले.
'मन की बात'मध्ये कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधाना मोदींनी इंडिया गेटजवळील 'अमर जवान ज्योती'च्या विलीनीकरणाबाबत आणि वॉर मेमोरियलबाबत माहिती दिली होती. त्या कार्यक्रमातही मोदींनी, लोकांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा वॉर मेमोरियलला भेट द्या, असं आवाहन केलं होतं. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी हे वॉर मेमोरियल देशवासीयांना समर्पित केले. इंडिया गेट संकुलात बांधलेल्या या स्मारकात स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शहीद जवानांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.