ऑनलाइन लोकमत सिडनी, दि. 24 : भारतीय अ संघाचा कर्णधार मनीष पांडे याच्यावर चार देशांच्या मालिकेतील नॅशनल परफॉर्मन्स स्क्वॅडविरुद्ध सोमवारी सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
मनीष पांडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे आणि त्याच्यावर ३0 टक्के सामना शुल्काचा दंड ठोठावण्यात आला होता; परंतु पांडेने त्याच्यावरील आरोप मान्य करीत दंडाच्या रकमेविषयी आव्हान दिले. त्यावर सामनाधिकारी पीटर मार्शल यांनी दंडाची रक्कम पाच टक्क्यांनी कमी केली, ती पांडेने मान्य केली.
भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान २८ व्या षटकात पांडेला फिरकी गोलंदाज मिशेल स्वॅप्सनच्या चेंडूवर बाद देण्यात आले. पांडेने हा चेंडू बॅकफूटवर खेळला आणि चेंडू पॅडला लागून दुसऱ्या स्लीपमध्ये पोहोचला. त्याच वेळेस पांडेने चेंडू प्रथम बॅटला लागल्याचा इशारा केला. त्या वेळेस तो ३0 चेंडूंत ३१ धावांवर खेळत होता; परंतु पंचांनी त्याला बाद ठरवले.
प्रतिस्पर्धी खेळाडू फलंदाज बाद केल्याचा जल्लोष करीत असताना पांडे जवळपास १0 सेकंद खेळपट्टीवरच उभा होता. पंच जेव्हा पांडेकडे जात होते तेव्हाच पांडे तंबूत परतला. पंचांच्या निर्णयावर तो नाराज होता. तथापि, पांडेवर लावण्यात आलेल्या दंडाचा परिणाम भारतीय अ संघावर झाला नाही आणि हा सामना इंडिया ए संघाने ८६ धावांनी जिंकला.