कोलंबो : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि टीम संचालक रवी शास्त्री यांनी श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकाराची प्रशंसा करताना त्याच्या सोनेरी कारकिर्दीची तुलना डॉन ब्रॅडमन व सचिन तेंडुलकर यांच्यासोबत केली. संगकारा भारताविरुद्ध कारकिर्दीतील १३४ वा आणि अखेरचा कसोटी सामना खेळून निवृत्त होणार आहे. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ३८ शतकांसह १२,३५० कसोटी धावा फटकावल्या आणि ४०४ वन-डे मध्ये २५ शतकांसह १४,२३५ धावा केल्या. कोहलीने संगकारा प्रेमळ व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. हा मास्टर फलंदाज भारताविरुद्ध कारकिर्दीतील अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असल्यामुळे आनंद झाला, असेही कोहलीने म्हटले आहे. बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना कोहली म्हणाला, ‘या वेळी संगकाराची मन:स्थिती कशी असेल, याची कल्पना आहे; पण गेल्या २० वर्षांपासून तो क्रिकेट खेळत असून, आता यापुढे खेळणार नाही, हा मोठा धक्का आहे. श्रीलंकेसाठी तो शानदार खेळाडू आहे. अनेक डावखुरे फलंदाज त्याला आपला आदर्श मानतात. त्याने जगात सर्वच संघाविरुद्ध धावा फटकावल्या आहे. आकड्यावरून याची कल्पना येते. व्यक्ती म्हणून संगकारा शानदार आहे.’शास्त्री यांनी संगकाराची तुलना तेंडुलकरसोबत केली. शास्त्री म्हणाले, ‘तो जगातील अव्वल दोन-तीन खेळाडूंपैकी एक आहे. या यादीमध्ये मोजके खेळाडू असतात. सचिन तेंडुलकरला या यादीमध्ये स्थान राहील. संगकाराने अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळविल्यानंतर ते अखेरपर्यंत कायम राखले. संगकाराने जगभर धावा वसूल केल्या आणि सहजपणे द्विशतके झळकावली. तो डॉन ब्रॅडमनच्या श्रेणीचा खेळाडू आहे.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘संगकाराने श्रीलंकेच्या भावी खेळाडूंपुढे आदर्श ठेवला आहे. संगकाराची कामगिरी बघता तो या खेळाचा महान दूत असल्याची प्रचिती येते. त्याने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. प्रत्येक श्रीलंकन नागरिकाला संगकाराच्या कामगिरीचा अभिमान राहील. श्रीलंकेचे दोन महान खेळाडू संगकारा व माहेला जयवर्धने यापेक्षा मोठ्या सन्मानाचे हकदार होते.’शास्त्री यांनी पुढे सांगितले की,‘माझ्या मते संगकारा व माहेला यांना तो सन्मान मिळाला नाही; त्याचे ते हकदार होते. हे दोन्ही खेळाडू भारतातर्फे खेळले असते तर त्यांना आणखी आदर व मानसन्मान मिळाला असता. संगकारा डावाची सुरुवात करतो किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळतो.’(वृत्तसंस्था)
निवृत्त होणाऱ्या संगकाराची भारतीय संघाने केली प्रशंसा
By admin | Published: August 17, 2015 10:55 PM