- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरला. असे वाटतं होतं, की भारतीय संघ यजमानांना क्लीन स्विप देईल. पहिला सामना जरी पावसामुळे रद्द झाला असला, तरी चौथ्या सामन्याकडे पाहता भारत या मालिकेत निर्भेळ यश मिळवेल, अशीच शक्यता होती. पण या सामन्यातील पराभवाने सर्व गणित बदलले. चौथ्या सामन्यात मोठे लक्ष्य नव्हते. १९० धावा बनवायचे होते तरी ११ धावांनी भारतीय अपयशी ठरले. महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांनी जी काही फलंदाजी केली, ते प्रश्न निर्माण करणारे होते. खेळपट्टी संथ होती, यामुळे फटके मारणे सहज शक्य नव्हते. तसेच अशा खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे कठीण होते, अशी सर्व कारणे मान्य आहेत. परंतु, ज्या प्रकारे विंडीजचा संघ दुबळा आणि भारताचा संघ सहजपणे जिंकत असताना हा पराभव अनपेक्षित होता. त्यातच विंडीज संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रताही मिळवली नव्हती आणि क्रमवारीत सध्या ते नवव्या स्थानी आहेत. त्यामुळेच या पराभवावर प्रश्न निर्माण होत आहेत.कर्णधार विराट कोहलीने म्हटले, की कधी कधी लहान लक्ष्याचा पाठलाग करताना समस्या येतात, हे खरेही आहे. परंतु, सामना ५० षटकांपर्यंत का खेचला जावा, हेच कळत नाही. एक तर आखलेल्या योजनांनुसार खेळ झाला नाही किंवा फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, ही दोन मुख्य कारण यामागे असतील. धोनीनेही अनपेक्षित खेळी खेळली. त्याने अर्धशतक जरुर ठोकले, पण स्ट्राईक रेट अत्यंत खराब होता. त्याने अखेरच्या क्षणी सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही तो अपयशी ठरला. दरम्यान, आता या पराभवामुळे भारताला एक झटका बसला आहे, तो म्हणजे ही मालिका अजूनही जिवंत आहे. विंडीजने अखेरच्या सामन्यात बाजी मारली तर ही मालिका बरोबरीत सुटेल. जर असे झाले तर भारतासाठी हे एका पराभवासारखेच असेल. आता वळूया भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदाच्या निवडीकडे. याबाबत अनेक रहस्ये वाढत आहेत, कारण केवळ रवी शास्त्री व व्यंकटेश प्रसाद यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, तर फिल सिमन्स यासारख्या अनुभवी प्रशिक्षक व प्रसारमाध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडूही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक आहे. त्यामुळे याबाबत उत्सुकता ताणली आहे. पण मला वाटते, की जोपर्यंत ९ जुलैची मुदत आहे तोपर्यंत या शर्यतीत आणखी काही नावांचा समावेश होऊ शकतो.जेव्हापासून अनिल कुंबळे या पदापासून दूर झाले तेव्हापासून अनेकांना संधी निर्माण झाल्या आहेत. तरी माझ्या मते, रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वेंकटेश प्रसाद यांच्यावरही विचार होऊ शकतो. पण, किती अर्ज आले त्यांची यादी होईल. त्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीकडे ही यादी जाईल. त्यांच्यावरच हा निर्णय अवलंबून असेल.
भारतीय संघाला झटका
By admin | Published: July 04, 2017 1:41 AM