World Archery Championship - ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला. यापूर्वी या स्पर्धेत भारताला ९ रौप्य व २ कांस्यपदक जिंकता आले होते. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत कोलंबियाचा २२०-२१६ असा पराभव केला होता. तिरंदाजी चॅम्पियनशिप ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा आयोजित केली जाते. ऑलिम्पिक पात्रतेसाठीही कोटा आहे.
ज्योती सुरेखा वेन्नमचा जन्म ३ जुलै १९९६ रोजी दक्षिण भारतीय शहर विजयवाडा येथे झाला. तिला लहानपणापासूनच खेळाडू व्हायचे होते. जागतिक क्रमवारीत ती १२व्या क्रमांकावर आहे आणि तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. तिचे वडील माजी कबड्डीपटू आहेत आणि आता विजयवाडा येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे. वयाच्या चौथ्या वर्षी ज्योतीने कृष्णा नदी तीन तास, २० मिनिटे आणि सहा सेकंदात ५ किमी अंतर तीन वेळा पार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. ज्योतीने तिचे शालेय शिक्षण आणि इंटरमिजिएट नालंदा संस्थेतून पूर्ण केले.
१६ वर्षीय आदितीने मागील महिन्यात कोलबिया येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड महिला गटात १८ वर्षांखालील विश्वविक्रम मोडला होता. तिने ७२० पैकी एकूण ७११ गुण मिळवले आणि मागील ७०५ गुणांचा जागतिक विक्रम मागे टाकला. पटियालाच्या परनीत कौरचे वडील अवतार हे सनौर येथील सरकारी शिक्षक, त्यांनी परनीतला छंद म्हणून खेळ घेण्यास प्रोत्साहन दिले.