टॉन्टन : सलामी लढतीत यजमान इंग्लंडला ३५ धावांनी धूळ चारणारा भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय नोंदविण्यास सज्ज झाला आहे. पहिल्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावला, हे विशेष. विंडीजला सलामीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून आठ गड्यांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. दुसरीकडे भारताने इंग्लंडविरुद्ध सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी केल्यामुळे विजयी लय कायम राखण्यास सर्वच खेळाडू उत्सुक आहेत. पहिल्या सामन्यात भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात २८१ धावा उभारल्यानंतर गोलंदाजांनी इंग्लंडला ४७.३ षटकांत २४६ धावांत रोखले. स्मृती मानधना ९०, पूनम राऊत ८६, मिताली राज ७१ आणि हरमनप्रीत कौरच्या नाबाद २४ धावांच्या खेळीपाठोपाठ गोलंदाजीत दीप्ती र्श्माने ४७ धावांत तीन, तसेच शिखा पांडेने दोन गडी बाद करीत यजमानांचे कंबरडे मोडले होते. क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरीसह प्रतिस्पर्धी चार फलंदाजांना धावबाद केले. कर्णधार मितालीने भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्याचे टार्गेट ठेवले आहे. तिने स्वत: विक्रमी सातव्यांदा अर्धशतकी खेळी केली. विंडीज विरुद्धदेखील ही लय कायम राखण्याचा निर्धार मितालीने व्यक्त केला. स्मृतीदेखील जखमेतून परतल्यानंतर शानदार फॉर्ममध्ये आली. विंडीजविरुद्ध गोलंदाजीचे नेतृत्व अनुभवी झुलन गोस्वामी करणार आहे.भारताने गेल्या चार मालिकांमध्ये दणदणीत विजय नोंदविला आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा त्यांच्याच देशात व्हाईटवॉश केल्यानंतर विश्वचषक क्वॉलिफायर फायनल्समध्ये तसेच चौरंगी मालिकेत द. आफ्रिकेवर विजय नोंदविला. अलीकडच्या लढतींवर नजर टाकल्यास भारतीय संघ विंडीजविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणार-भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिष्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, नुजहत परवीन.वेस्ट इंडिज : स्टेफनी टेलर (कर्णधार), मेरिसा एगुलेरिया, रेनीस बोयसे, शर्मिला कोनेल, शानेल डाले, डियांडा डोटिन, एफी फ्लेचर, कियाना जोसफ, किशोना नाइट, हेले मॅथ्यूज, अनीसा मोहम्मद, चेडीन नेशन, अकीरा पीटर्स, शकीरा सेलमान, फेलिसिया वॉल्टर्स.
विंडीजवर विजय नोंदविण्यास भारतीय महिला उत्सुक
By admin | Published: June 29, 2017 12:50 AM