हैंस्टिग्स : अंतिम क्षणी नियंत्रण गमावल्याने भारतीय महिलांना हॉक्स बे हॉकी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात चीन विरुद्ध १-२ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. अखेरच्या क्षणी खेळाडूंमध्ये ताळमेळ चुकल्याने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीयांना पराभवास सामोरे जावे लागले. भारत-चीन लढतीची सुरुवात हळूवार झाली. या वेळी बहुतांश खेळ मिडफिल्डमध्येच झाला. पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केलेल्या चीनने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, त्या सत्कारणी लावण्यात त्यांना अपयश आले. गोलरक्षक सविताने अप्रतिम बचाव करताना चीनला मिळालेले पेनल्टी कॉर्नर यशस्वी रोखले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीयांनी वेगवान खेळ केला. १९व्या मिनिटाला राणीने केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर भारताने १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर लगेच चीनने जोरदार प्रत्युत्तर देताना पेनल्टी कॉर्नर मिळवली. मात्र, पुन्हा एकदा सविताने यशस्वीपणे बचाव करताना चीनच्या प्रयत्नांना अपयशी ठरवले.तिसऱ्या क्वार्टरमध्ये बहुतांश वेळा चेंडूवर चीनचे वर्चस्व राहिले. या वेळी मोनिकाने निर्णायक कामगिरी करताना भक्कम बचावाच्या जोरावर चिनी आक्रमण रोखले. मात्र, या क्वार्टरच्या अंतिमक्षणी यू कियान गोल करून सामना १-१ असा बरोबरी केला. या गोलमुळे आत्मविश्वास वाढलेल्या चिनी खेळाडूंनी चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्येही आपला धडाका कायम राखला. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी वेगवान व आक्रमक खेळ केला. या वेळी दीपिकाने गोल करण्याच्या सर्वाधिक संधी निर्माण केल्या; मात्र तिला गोल करण्यात यश आले नाही, तर चीनच्या वांग मेंगयू हिने संघाचा दुसरा गोल करून सामन्यात चीनला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या पाच मिनिटांत मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा अचूक फायदा उचलत मेंगयूने संघाला विजयी केले. (वृत्तसंस्था)
भारतीय महिलांना ‘ड्रॅगन’चा विळखा
By admin | Published: April 06, 2016 4:35 AM