सुरत : भारतीय महिला खेळाडूंनी एफ गटातील साखळी सामन्यात वेल्स संघाचा ३-० गेमने पराभव करून २० व्या राष्ट्रकुल अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे भारतीय पुरुष संघाने आयर्लंडला ३-० गेमने नमविले. भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंडविरुद्ध होईल. भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने सुरत येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय इंडोन हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या गटात भारताच्या मौमा दासने वेल्सच्या मेगन फिलिप्सचा ९-११, १२-१०, ११-६, ११-३ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मनिका बत्राने चारलोत्ते केरेला ११-७, ११-८, ११-८ असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. तिसऱ्या लढतीत शामिनीने च्लोये थॉमसला ११-९, १०-१२, ११-४, ११-२ असे नमविले. पुरुषांच्या गटात पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडला ३-० ने पराभूत केले. भारताच्या सौम्यजीत घोषने आयर्लंडच्या जॅक विल्सनला ११-५, ११-६, ११-४ असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात अॅन्थोनी अमलराजने अॅश्ले रॉबीन्सनला ११-१३, ११-४, ११-७, ११-९ असे नमविले. तिसऱ्या लढतीत साथीयाने ओव्हेन कथकर्टला ११-५, ११-३, ११-४ असे पराभूत केले.भारतीय पुरुषांनी दुसऱ्या साखळी सामन्यात श्रीलंकेला ३-० ने नमविले. पहिल्या गेममध्ये हरमीतने रोहन सीरीसेनाला ११-४, ११-१, ११-५ असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात सौम्यजीतने जयसंका डी-सील्वाला ११-६, ११-८, ११-८ असे नमविले. तिसऱ्या सामन्यात अॅन्थोनी अमलराजने चमिरा गिनीगेला ११-४, ११-४, ११-४ असे पराभूत केले. महिलांच्या गटात सिंगापूर संघाने श्रीलंका संघाला ३-० ने नमविले. उपांत्य फेरीत श्रीलंकेचा सामना वेल्स संघाविरुद्ध होईल.(वृत्तसंस्था)
भारतीय महिलांकडून वेल्स पराभूत
By admin | Published: December 18, 2015 3:14 AM