ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 03 - भारतीय महिला हॉकी संघाने येथे खेळल्या जात असलेल्या पाच मन्यांच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी कायम राखली आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुस-या लढतीत भारताने बेलारुसचा २-१ ने पराभव केला.
भारताने नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवत चांगली सुरुवात केली. स्ट्रायकर राणीने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बेलारुसने त्यानंतर पुढच्या दोन क्वॉर्टरमध्ये तुल्यबळ खेळ करीत भारतीय महिलांना रोखण्यात यश मिळवले. ३६ व्या मिनिटाला श्वेतलाना बाहुशेविचने मैदानी गोल नोंदवित बेलारुसला बरोबरी साधून दिली.
६० व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरला. लालरेमसियामीने यावर गोल नोंदवित भाररताचा विजय निश्चित केला. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.