डर्बी : पाठोपाठ दोन विजय नोंदविणारा भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढत देणार असून, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या भारताचे पारडे जड मानले जात आहे. पाकिस्तान संघ या स्पर्धेत अद्यापही चांगली कामगिरी करू शकलेला नाही. भारताने मागील चार मालिका जिंकल्या आहेत. भारताने आधी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर द. आफ्रिकेला आयसीसी पात्रता सामन्यात व त्यानंतर चौरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यातदेखील धूळ चारली होती. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांत सहज विजयाची नोंद करणाऱ्या मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ३५ धावांनी आणि त्यानंतर वेस्ट इंडिजला सात गड्यांनी नमविले. सना मीरच्या नेतृत्वाखालील पाक संघाला स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. पाकने द. आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना तीन गड्यांनी गमविला, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्यांचा डकवर्थ- लुईस नियमांच्या आधारे १०७ धावांनी पराभव केला. पाक संघ विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्ध विजय मिळविणे ही पाकसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. (वृत्तसंस्था)भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत प्रवीण.पाकिस्तान : सना मीर (कर्णधार), असमाविया इक्बाल, आयशा जफर, डायना बेग, गुलाम फातिमा, इरान जावेद, जावेरिया खान, कायनात इम्तियाझ, मरिना इक्बाल, नाहिदा खान, नैन अबिदी, नास्रा संधू, सादिया युसूफ, सिद्रा नवाज, वाहिदा अख्तर आणि बिसमाह महारुफ.भारत आघाडीवरविजय मिळविण्याचा पाकचा मार्ग सोपा नाही. भारताने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली असून, स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडू यशस्वी ठरले आहेत. इंग्लंडविरुद्ध फलंदाज चमकले, तर विंडीजविरुद्ध गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या ‘नाकीनऊ’ आणले. वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज झुलन गोस्वामी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. फलंदाजीत स्मृती मानधना सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. डावखुरी फलंदाज असलेल्या स्मृतीने जखमेतून सावरताना इंग्लंडविरुद्ध ९० व त्यानंतर विंडीजविरुद्ध १०८ चेंडूत १०६ धावा ठोकल्या. कर्णधार मिताली राजने विक्रमी सात सामन्यांत अर्धशतके ठोकली आहेत. मागच्या सामन्यात तिचे अर्धशतक केवळ चार धावांनी हुकले होते. पाकिस्तानविरुद्ध खेळताना संघाला अतिआत्मविश्वासापासून मात्र दूर राहावे लागणार आहे.