कोलंबो : कर्णधार मिताली राज आणि मोना मेश्रामच्या अर्धशतकी खेळीपाठोपाठ शिखा पांडे, तसेच एकता बिश्त यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक पात्रता सुपरसिक्सच्या पहिल्या सामन्यात बुधवारी द. आफ्रिकेवर ४९ धावांनी शानदार विजय नोंदविला.साखळी फेरीत सर्वच सामने जिंकणाऱ्या भारताने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ५० षटकांत ८ बाद २०५ धावा उभारल्या. मितालीने पुन्हा एकदा संकटमोचक बनून ६४, तसेच मोना मेश्रामने ५५ धावांचे योगदान दिले. या दोघींनी दुसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली. द. आफ्रिकेनेदेखील साखळीत सर्वच सामने जिंकून भारतासारखाच चार गुणांसह सुपरसिक्समध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे नांगी टाकताच ४६.४ षटकांत १५६ धावांत संपूर्ण संघ बाद झाला.भारतीय वंशाची यष्टिरक्षक-फलंदाज तृषा चेट्टीने ५२ धावा करीत एकाकी झुंज दिली. मध्यम जलदगती गोलंदाज शिखा पांडे हिने करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ३४ धावांत चार गडी बाद केले. डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्तने १० षटकांत २२ धावांत ३ गडी टिपले. दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांनी एकेक गडी बाद केला. शिखा-एकता यांनी पहिल्या चार षटकांत द. आफ्रिकेच्या सलामी जोडीला तंबूची वाट दाखविली. तृषा चेट्टीने मात्र जवळपास ३० षटके एक टोक सांभाळले, पण भारतीय माऱ्यापुढे तिला मोकळेपणाने खेळता आले नाही. कर्णधार डेन वॉन नीकर्कने २० आणि मारिझोन कॅपने २९ धावा केल्या. दीप्ती शर्मा (९) बाद झाल्यानंतर मोनाने धावसंख्येला आकार दिला. तिने ८५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ५५ धावांचे योगदान दिले. अष्टपैलू हरमनप्रित कौर (७) ही लवकर बाद झाल्यानंतर ४० व्या षटकापर्यंत मितालीने खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. वेदा कृष्णमूर्ती, वेदिका वैद्य आणि शिखा पांडे यांनीही चांगले योगदान देत २०० चा पल्ला गाठून दिला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकला पाच गड्यांनी धूळ चारली. पाकने प्रथम फलंदाजी करीत ५० षटकांत ७ बाद २१२ धावा केल्या. लंकेने ४७.४ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात २१६ धावा करीत सामना जिंकला. बांगलादेशने आयर्लंडला ७ गड्यांनी सहज नमविले. आयर्लंडला ४७.१ षटकांत १४४ धावांत रोखणाऱ्या बांगला संघाने ३९.१ षटकांत ३ बाद १४५ धावा करीत विजय साकारला.(वृत्तसंस्था)
भारतीय महिलांचा द. आफ्रिकेवर विजय
By admin | Published: February 16, 2017 12:07 AM