मुलापाडू : कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना यांच्या उपयुक्त खेळीमुळे भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर पाच गड्यांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताचा हा दुसरा विजय आहे. यासोबतच भारताने मालिकाही खिशात घातली.वेस्ट इंडीजने नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजी करताना सात बाद १५३ धावा केल्या. भारताने ३८ षटकांत पाच बाद १५४ धावा करत विजय मिळवला. या विजयाने भारताला आयसीसी क्रमवारीत दोन गुणांसह एका स्थानाचा फायदा झाला आहे. १७ गुणांसह भारत पाचव्या स्थानी आहे. भारताने वेस्ट इंडीजला सुरुवातीलाच मोठे झटके दिले. त्यातून विंडीजचा संघ सावरू शकला नाही. अष्टपैलू खेळाडू डिंड्रा डोटिन हिने १०१ चेंडंूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६३ धावा केल्या. मात्र, कोणत्याही फलंदाजाला वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. तिच्यासोबतच मेरिसा एगुलिएरा हिने २५ धावांचे योगदान दिले. भारताच्या झुलन गोस्वामी आणि एकता बिष्ट यांनी प्रत्येकी दोन तर शिखा पांडे आणि अनिसा मोहम्मद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवातही काहीशी निराशाजनक होती. तिरुष कामिनी ही चौथ्या षटकातच बाद झाली. मात्र, स्मृती मानधना (४४) आणि दीप्ती शर्मा (३२) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. दोन्ही संघांतील तिसरा आणि अखेरचा अंतिम सामना याच मैदानावर १६ रोजी होईल. (वृत्तसंस्था)
भारतीय महिलांचा विंडीजवर मालिका विजय
By admin | Published: November 14, 2016 1:52 AM