मोहाली : निराशाजनक प्रदर्शन कायम राहिल्याने भारताच्या महिला संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध ३ धावांनी पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील हा अखेरचा साखळी सामना गमावल्यानंतर, यजमान भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर, फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले.पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या डिंड्रा डॉट्टीन हिने निर्णायक अष्टपैलू खेळ करताना भारताला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचा डाव २० षटकांत ८ बाद ११४ असा मर्यादित धावसंख्येत रोखण्यात भारताला यश आले. हरमनप्रीत कौर (४/२३) आणि अनुजा पाटील (३/१६) यांनी टिच्चून मारा करताना विंडीजला रोखले. त्याचवेळी सलामीवीर व कर्णधार स्टेफनी टेलर (४५ चेंडूंत ४७) आणि डिंड्रा (४० चेंडंूत ४५) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे विंडीजला शतकी मजल मारता आली. या दोघींव्यतिरीक्त इतर कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले नाही.यानंतर छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव ९ बाद १११ धावांमध्ये रोखून विंडीजने रोमांचक बाजी मारली. डिंड्राने (३/१६) गोलंदाजीतही चमक दाखवताना तिघींना बाद करून भारताला जखडवून ठेवले. अॅफी फ्लेचरनेही (२/१५) चांगला मारा केला. भारताची कर्णधार मिताली राज डावातील पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाली. त्या धक्क्यातून भारतीय अखेरपर्यंत सावरलेच नाही. स्मृती मानधना (२२), अनुजा पाटील (२६) आणि झूलन गोस्वामी (२५) यांनी चांगला प्रतिकार केला. वेदा कृष्णमूर्तीनेही १८ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने त्यांची लढत अपयशी ठरली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : २० षटकांत ८ बाद ११४ धावा (स्टेफनी टेलर ४७, डिंड्रा डॉट्टीन ४५; हरमनप्रीत कौर ४/२३, अनुजा पाटील ३/१६) वि.वि. भारत : २० षटकांत ९ बाद १११ धावा (अनुजा पाटील २६, झूलन गोस्वामी २५, स्मृती मानधना २२; डिंड्रा डॉट्टीन ३/१६, अॅफी फ्लेचर २/१५)
भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: March 28, 2016 3:30 AM