सिंगापूर : दीपिका ठाकूरने शेवटच्या मिनिटांत नोंदविलेल्या अफलातून गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने चीन संघाचा २-१ गोलने पराभव करून आशियाई चषकावर आपले नाव कोरले. गेल्या आठवड्यात पुरूष संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून आशियाई विजेतेपद जिंकले होते. भारताच्या या विजयात दीप ग्रेस एक्का हिने १३ व्या मिनिटाला आणि दीपिकाने ६0 व्या मिनिटाला केले. चीनकडून एकमेव गोल झोंग मेंगलीगने ४४ व्या मिनिटाला केला. भारतीय पुरुष संघाने ३0 आॅक्टोबरला मलेशियातील कुआंटन येथे झालेल्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला होता. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा हा चषक आपल्या नावांवर केला आहे. भारतीय संघ २0१३ साली जपानकडून हरल्यामुळे उपविजेता राहिली होती. २0१0 च्या पहिल्या स्पर्धेत भारताला तिसरे स्थान मिळाले होते. विशेष म्हणजे भारताला लीग सामन्यात गेल्या शुक्रवारी चीनकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले होते. गुण तक्त्यात चीन ९ गुणांसह पहिल्या तर सात गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर होता.अंतिम सामन्यात मात्र भारताने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत भारतीय हॉकीप्रेमींना दुहेरी आनंदाची संधी दिली. दीपिकाने शेवटचा हुटर वाजण्यास २0 सेकंद बाकी असताना पेनाल्टी कॉर्नरच्या रिबाउंडवर विजेच्या चपळाईने विजयी गोल डागला. तिच्या या कामगिरीने भारतीय संघाने जल्लोष केला, तर चीनी खेळाडू अवाक होउन पहात राहिले. तत्पूर्वी, दीप ग्रेस एक्काने पहिल्या क्वार्टरमध्ये १३ व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. अर्ध्या वेळेपर्यंत ही आघाडी कायम होती. तिसरा क्वार्टर संपण्यास एक मिनिट बाकी असताना झोंग मेंगलिगने गोल नोंदवून चीनला बरोबरी साधून दिली.(वृत्तसंस्था)आशियाई चषक विजेत्या महिला संघाला पंतप्रधानांच्या शुभेच्छानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताने सिंगापूरमध्ये चीन विरोधातीला अंतिम सामन्यात २-१ ने विजय मिळवला. या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलवर संघाला शुभेच्छा देत लिहिले की, ‘आमच्या हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स चषक २०१६च्या विजेतेपदाबद्दल शुभेच्छा, भारतीय हॉकीसाठी हा खूप मोठा क्षण आहे.’ भारतीय महिला संघाच्या आधी पुरुष संघाने मलेशियातील कुआंटन येथे पाकिस्तानला पराभूत करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली होती.भारतीय महिला खेळाडू आणि प्रशिक्षकांना दोन लाखांचे बक्षीसनवी दिल्ली : हॉकी इंडियाने सिंगापूर येथे पहिल्यांदा आशियाई चॅम्पियन्स चषक पटकावणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक सदस्याला आणि प्रशिक्षकांना प्रत्येकी दोन लाख रुपये रोख पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. भारतीय संघाने चीनला २ -१ ने पराभूत करत पहिल्यांदाच हा चषक पटकावला. विजयानंतर लगेचच हॉकी इंडियाने ही घोषणा केली. हॉकी इंडियाने या सोबतच संघाच्या सपोर्ट स्टाफला देखील प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. स्पर्धेतील अव्वल स्कोअरर दीपिका ठाकूर हिला अतिरीक्त एक लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
भारतीय महिला चॅम्पियन
By admin | Published: November 06, 2016 2:54 AM