नवी दिल्ली : भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जपानचा ४-० असा पराभव करत भारताच्या 'नारी शक्ती'ने सुवर्ण पदक जिंकले. भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. तत्पुर्वी, शनिवारी भारताच्या लेकींनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जपानचा धुव्वा उडवत भारतीय शिलेदारांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
रविवारी रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंग ॲस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवला गेला. या विजयानंतर हॉकी इंडियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपये बक्षिस म्हणून दिले जातील. यासोबतच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला १.५ लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत.
भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुवर्ण पदक विजेत्या 'नारी शक्ती'चे अभिनंदन केले.
भारताचा एकतर्फी विजयभारताकडून संगीता कुमारी (१७वा मिनिट), नेहा (४६वा मिनिट), लालरेमसियामी (५७वा मिनिट) आणि वंदना कटारिया (६०वा मिनिट) यांनी गोल केले. रोषणाईच्या कारणास्तव सामना ५० मिनिटे उशिरा सुरू झाला. सुरुवातीच्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर ताबा राखला अन् जपानी खेळाडूंना तरसावले. जपानही जोरदार प्रयत्न करत होता पण भारताची गोलरक्षक सविता पुनियाने जपानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या हाफच्या अखेरीस जपानला अनेदका पेनल्टी शूटआऊट मिळाले पण भारताची गोलरक्षक सवितासह सर्व संघाने पेनल्टी फेल करत गोल होण्यापासून संघाला वाचवले. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दुसरा गोल केला. यानंतर लालरेमसियामी आणि वंदना कटारिया यांनी शेवटच्या क्षणी आणखी दोन गोल केले, ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला अन् भारताने ४-० ने एकतर्फी विजय मिळवला. भारताने यापूर्वी २०१६ मध्ये सिंगापूर येथे पहिल्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता. तर २०१३ आणि २०२१ मध्ये हा किताब पटकावण्यात जपानला यश आले होते.