ऑनलाइन लोकमतजोहान्सबर्ग, दि. 17 : भारतीय महिला हॉकी संघाला महिला विश्वकप हॉकी लीग सेमीफायनलच्या अखेरच्या साखळी लढतीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाविरुद्ध ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अर्जेंटिनातर्फे रोशियो सांचेस (दुसरा मिनिट), मारिया ग्रानाटो (१४ वा मिनिट) आणि नोएल बिरियोनुएव्हो (२५ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. रोशियोने दुसऱ्याच मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने आघाडी घेतली. भारतीय गोलकिपर सविताने सुरुवातीपासून अनेकदा अर्जेंटिनाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. सविताने रोशियोचा पहिला फटका अडवला, पण दुसऱ्या फटक्यावर मात्र तिने गोल नोंदवला. त्यानंतर भारतीय संघाला बरोबरी साधण्याची संधी होती. नमिता टोप्पोच्या पासवर वंदना कटारियाने गोल नोंदविण्याचा केलला प्रयत्न प्रतिस्पर्धी गोलकिपरने हाणून पाडला. सविताने पहिल्या १५ मिनिटांमध्ये चारदा अप्रतिम बचाव केला. अर्जेंटिनाने पहिला पेनल्टी कॉर्नर सहाव्या मिनिटाला मिळवला, पण नमिताने प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. मारिया ग्रानाटोने १४ व्या मिनिटाला गोल नोंदवित अर्जेंटिनाला २-०० अशी आघाडी मिळवून दिली. भारताला २३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण राणीचा फटका प्रतिस्पर्धी गोलकिपरने रोखला. अर्जेंटिनाला २५ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर नोएलने गोल केला. अर्जेंटिनाला ३४ व्या मिनिटाला सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलकि पर रजनीने त्यावर उत्कृष्ट बचाव केला. मध्यंतरानंतर सविताच्या स्थानी रजनीने गोलकिपरची भूमिका बजावली. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारतीय बचावपटूंनी अर्जेंटिनाला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारताला मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिनाकडून पराभूत
By admin | Published: July 17, 2017 5:46 PM