मेरठ येथील भालाफेकपटू अन्नू राणी ( Annu Rani) हिनं जागतिक अॅथलेटिक्स रँकिंग सिस्टमच्या आधारावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. अन्नू राणीला ऑलिम्पिक तिकीट मिळाल्यानं तिचं गाव बहादुरपूर येथे आनंदाचं वातावरण आहे. १२ वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक समस्येवर मात करून अन्नूनं सातत्यानं दमदार कामगिरी केली आणि अखेर तिचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तिनं नुकतंच ६३.२४ मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले होते. पण, ऑलिम्पिक पात्रतेसाठीचे अंतर .७७ मीटरनं ती हुकली होती. जागतिक क्रमवारीच्या आधारावर तिला ऑलिम्पिक तिकीट मिळाले आहे.
अन्नू राणीनं २०१४च्या आशियाई स्पर्धेत कांस्य, २०१५च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिनं आठ वेळा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.