ऑनलाइन लोकमतकोलंबो, दि. 21 - आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या पात्रता सामन्यात भारतीय महिला संघानी द. आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आहे. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एक गडी राखून पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने यापुर्वीच विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी कोणत्याही दडपणाशिवाय सर्वोत्तम खेळ केला. शेवटच्या पात्रता सामन्यात भारताने आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे विश्वचषक सामन्यात भारतीय महिलांचा विश्वास वाढण्यास मदत होईल. द.आफ्रिकेविरोधात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने एका विकेटने विजय मिळवला. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने तीन तर शिखा पांडेने दोन बळी मिळवले. आफ्रिकेच्या 244 धावांचा पाठलाग करताना भारताने धमाकेदार सुरुवात केली. मोना मिश्राने संयमी फलंदाजी करताना 82 चेंडूत 59 धावांची खेळी करत भारताच्या विजयाच मोलाची भूमिका बजावली. 43 षटकानंतर भारताची 4 बाद 209 अशा चांगल्या स्थितीत असताना त्यानंतर 14 धावामध्ये भारताने चार विकेट गमावत सामन्यात थरारकता आणली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी नऊ धावांची गरज असताना पूनम यादव बाद झाली आणि भारतीय संघ पराभवाच्या छायेत गेला. पाच चेंडूत नऊ धावांची गरज असताना हरमनप्रित स्ट्रईकवर होती. पण तीन चेंडूवर हरमनप्रीतला एकही धाव घेता आली नाही. शेवटच्या दोन चेंडूवर आठ धावांची गरज असताना हरमनप्रीतने षटकार लगावत भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत भारताने आफ्रिकेवर थरारक विजय मिळवला. पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स फेरीच्या गुणतालिकेत भारतीय महिला अव्वल स्थानी राहिल्या, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले. दहा संघांच्या या स्पर्धेत या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तसेच, या स्पर्धेतील अव्वल चार संघांनी केवळ विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला नसून आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपली जागा निश्चित केली आहे. भारत व दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
भारतीय महिला संघाचा आफ्रिकेवर थरारक विजय
By admin | Published: February 21, 2017 8:26 PM