मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकोणिसाव्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. कारण भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने आगामी स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीनच्या यजमानात १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विनेशने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली. डाव्या गुडघ्याला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाल्याने भारतीय पैलवान आगामी स्पर्धेला मुकणार आहे.
विनेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मला एक अत्यंत दुःखद बातमी शेअर करायची होती. काही दिवसांपूर्वी १३ ऑगस्ट २०२३ रोजी माझ्या डाव्या गुडघ्याला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली. स्कॅन आणि तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, दुर्दैवाने मला बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. माझ्यावर १७ ऑगस्ट रोजी मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. जकार्ता येथे २०१८ मध्ये जिंकलेले माझे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक भारतासाठी राखून ठेवण्याचे माझे स्वप्न होते. पण दुर्दैवाने, या दुखापतीमुळे मला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवता यावे यासाठी मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कळवले आहे. एकूणच विनेशला आगामी स्पर्धेत सुवर्ण जिंकून २०१८ मध्ये जिंकलेले पदक राखायचे होते पण ती यासाठी मैदानात नसणार आहे.
तसेच सर्व चाहत्यांनी मला असाच पाठिंबा द्यावा अशी विनंती करू इच्छितो. जेणेकरून मी लवकरच मॅटवर जोरदार पुनरागमन करू शकेन आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकची तयारी करू शकेन. तुमच्या पाठिंब्याने मला खूप बळ मिळते, असेही विनेश फोगाटने म्हटले आहे.