Commonwealth Games 2022, Anshu Malilk: भारतीयकुस्तीपटू अंशू मलिक हिने ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशू मलिकने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोत्झचा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिम्नेडीसचा १०-० असा पराभव केला होता. आजच्या सामन्यातही अंशूने सुरूवातीचे २ राऊंड्स मिनिटभराच्या आतच जिंकले. पण नंतर सामना फिरला. दोन वेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिने आपला आक्रमक खेळ दाखवला आणि अखेर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
२१ वर्षीय कुस्तीपटू अंशू मलिकचा जन्म हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील एका कुस्ती खेळणाऱ्या कुटुंबात झाला. तिचे वडील धरमवीर मलिक हे देखील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू होते. अंशूने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२० मध्ये कांस्यपदक आणि २०२१ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय वैयक्तिक कुस्ती विश्वचषक २०२० मध्ये तिने रौप्य पदक देखील जिंकले होते. आज ती भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून देईल अशी आशा होती, पण अखेर तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.