ढाका : भारतीय तरुण खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत यजमान बांगलादेशला रोमहर्षक सामन्यात पराभूत करीत १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ असे पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशला ५-४ असे पराभूत करीत विजेतेपदाबरोबर साखळी सामन्यात झालेल्या पराभवाचाही हिशेब चुकता केला. भारताने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. यापूर्वी २००१ मध्ये भारताने विजेतेपद पटकाविले होते.मौलाना बशानी नॅशनल हॉकी स्टेडियमवर भारत व बांगलादेश दरम्यान झालेला अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला. दोन्ही संघांनी अत्युच्च दर्जाचा खेळ केला. बांगलादेशच्या रोमन सरकारने सुरुवातीलाच गोल करीत आघाडी मिळविली; मात्र त्यांनतर दोन मिनिटांतच भारताच्या शिवम आंनद याने गोल करीत भारताला बरोबरी साधून दिली. बांगलादेशच्या मोहम्मद मोहसिनने गोल करत पूर्वार्ध संपन्याला काही वेळ शिल्लक असताना सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमक खेळावर भर दिला. हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत २-२ अशी बराबरी साधली. दिलप्रीत सिंगने लगेचच गोल करत ३-२ अशी आघाडी मिळविली. मात्र, बांगलादेशच्या खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले सामन्याच्या ६० व्या मिनिटाला त्यांच्या मोहम्मद अशरफुल इस्लाम याने गोल करत सामना पुन्हा ३-३ असा बरोबरीत आणला. त्यानंतर भारताच्या इबुंगी सिंग कोंजेगबाम याने गोल करत ४-३ अशी आघाडी घेतली मात्र ही आघाडी खूप काळ टिकली नाही. ६४ व्या मिनिटाला महबूब हुसैन याने गोल करत सामना पुन्हा बरोबरीत आणला. सामन्याच्या ६९ व्या मिनिटाला भारताच्या अभिषेकने गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक सिंगला सामनावीर तर पंकजकुमार रजकला सर्वोत्कृष्ठ गोलरक्षक म्हणून गौरवण्यात आले. (वृत्तसंस्था)
बांगलादेशला हरवून भारतीय युवा ‘आशिया चॅम्पियन’
By admin | Published: October 01, 2016 1:07 AM