अभिजित देशमुखकाही महिन्यांपूर्वी १५० भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी सहज पात्र ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली होती; पण अनेक देशांनी कोविडमुळे प्रवासबंदी केली आहे, त्यामुळे अनेक खेळाडूंच्या ऑलिम्पिक पात्रतेवर धोका निर्माण झाला आहे. भारताचे आतापर्यंत ९१ खेळाडू ११ क्रीडाप्रकारांत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
महिला रिले संघभारतीय ४x४०० आणि ४x१०० महिला रिले संघ कदाचित यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसणार नाहीत. २००२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत ४x४०० महिला संघाने नेहमी गोल्ड मेडल जिंकले आहेत. सर्व भारतीय ॲथलेटिक्स खेळाडू (१-२ मे) दरम्यान पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड रिले ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी सज्ज होते. भारतातून पोलंडला थेट विमानसेवा नसल्यामुळे, भारतीय संघ हॉलंड मार्गे पोलंडमध्ये दाखल होणार होता; पण हॉलंडने भारतीयांना प्रवासबंदी घातल्यामुळे ॲथलेटिक्स संघाला विमानामध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरू शकणाऱ्या महिला रिले संघाचे आव्हान जवळ जवळ संपले आहे.
कॅनोईंगदहा सदस्य असलेल्या भारतीय कॅनोइंग संघ पटाया, थायलंड (३० एप्रिल-७ मे ) येथे होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला मुकला आहे. या स्पर्धेसाठी १० दिवस विलगीकरण आवश्यक होते, त्यासाठी भारतीय संघ १६ एप्रिलला रवाना होणार होता; पण थायलंडने शेवटच्या क्षणी भारतातून थेट विमानसेवा बंद केल्यामुळे कॅनोइंग संघाला धक्का बसला. इतर कुठल्याही देशातून शेवटच्या क्षणी विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे कॅनोइंग संघाचे ऑलिम्पिक स्वप्न संपुष्टात आले.
मलेशिया व्हाया कतार?भारतीय ओपन सुपर ५०० स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदंबी श्रीकांत आणि अश्विनी पोनाप्पा - सिक्की रेड्डी जोडी यांची ऑलिम्पिक पात्रता धोक्यात दिसत आहे. त्यामुळे उरलेल्या दोन स्पर्धा मलेशिया (मे २५-३०) आणि सिंगापूर (जून १-६) येथे उत्तम कामगिरी करावी लागेल. पण दोन्ही देशांनी भारतातून थेट विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे मलेशिया व्हाया कतार किंवा आणखी कुठला देश परवानगी देतो याचे नियोजन भारतीय बॅडमिंटन संघटनेला करावे लागेल. पी. व्ही. सिंधू, साई प्रनिथ, चिराग रेड्डी - सात्विकराज रांकीरेड्डी हे आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.