बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (CWG 2022) भारतीय खेळाडूंना अद्याप पदकांचे खाते उघडता आले नाही. मात्र भारतीय खेळाडूंनी आपल्या शानदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारताची १४ वर्षीय स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंगने (Anahat Singh)स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताच्या सर्वात युवा खेळाडूने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे.
अनाहत सिंगने राउंड ऑफ ६४ मध्ये शानदार विजय मिळवला. सेंट व्हिन्सेंट अॅंड ग्रेनेडाइन्सचा खेळाडू जडा रॉसचा (Jada Ross) ११-५, ११-२, ११-० असा पराभव करून अनाहतने विजयाचे खाते उघडले. "हा विजय माझ्यासाठी खूप आनंद देणारा असून मी विजय साजरा देखील करत आहे", असे अनाहतने विजयानंतर म्हटले.
भारतीय गटातील सर्वात युवा खेळाडूअनाहत सिंग अवघ्या १४ वर्षांची असून ती भारतीय गटातील सर्वात युवा खेळाडू आहे. ती स्क्वॅशच्या महिला एकेरीत खेळण्यासोबतच महिला दुहेरीमध्ये सुनयला कुरूविला सोबत देखील मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय स्क्वॅशमध्ये सौरव घोषाल आणि दीपिरा पल्लीकल यांसारख्या स्टार खेळाडूंचा देखील समावेश आहे. अनाहत सिंगने शानदार सुरूवात करून महिला एकेरीच्या राउंड ३२ मध्येही प्रवेश केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे १४ वर्षीय अनाहतने २१ वर्षीय प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट केल्याने स्क्वॅशच्या खेळाचीही खूप चर्चा रंगली आहे.
दिल्लीतील तरूणीचा डंकादिल्लीत जन्मलेल्या अनाहत सिंगने स्क्वॅश खेळण्याची प्रेरणा तिची मोठी बहीण अमीरा कडून घेतली आहे. १९ वर्षाखालील स्क्वॅश स्पर्धांमध्ये अमीराने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या अमीरा ब्रिटन हार्वर्ड विद्यापीठात तिचे पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच तिथेही अमीरा हार्वर्ड महिला संघासाठी स्क्वॅश खेळते. अनारत सिंगचे वडील गुरशरण सिंग पेशाने वकील आहेत तर आई एक इंटिरियर डिझायनर आहे.