कोलंबो : श्रीलंकेचा कर्णधार अॅन्जेलो मॅथ्यूजने झळकविलेल्या झुंझार शतकी खेळीनंतरही भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला ३०६ धावांत रोखले. शनिवारी तिसऱ्या दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावांत १ बाद ७० धावा केल्या असून, पहिल्या डावातील ८७ धावांसह भारताने १५७ धावांची आघाडी घेतली आहे. कालच्या ३ बाद १४० धावसंख्येवरून पुढे खेळताना मॅथ्यूज (१०२) व लाहिरू थिरिमाने (६२) यांनी चौथ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केल्यामुळे श्रीलंका संघ पहिल्या डावात आघाडी मिळवणार, असे चित्र होते, पण त्यानंतर ६५ धावांच्या मोबदल्यात अखेरचे ७ गडी तंबूत परतले. चहापानाच्या ब्रेकनंतर श्रीलंकेचा पहिला डाव ३०६ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे लेगस्पिनर अमित मिश्राने २१ षटकांत ४३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. ईशांत शर्मा व आश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारताची दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या डावातील शतकवीर के. एल. राहुल (२) पहिल्याच षटकात माघारी परतला. त्याला धम्मिका प्रसादने बाद केले. त्यानंतर मुरली विजय (नाबाद ३९) व अजिंक्य रहाणे (नाबाद २८) यांनी संयमी फलंदाजी करीत दिवसअखेर भारताला दुसऱ्या डावात १ बाद ७० धावांची मजल मारून दिली. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असलेल्या या कसोटीत भारताकडे एकूण १५७ धावांची आघाडी आहे. श्रीलंकेचा कर्णधार अॅन्जेलो मॅथ्यूजची शतकी खेळी तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे आकर्षण ठरली. त्याने १२ चौकार ठोकले. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंका संघाने वर्चस्व गाजवले. त्यांनी उपाहारापर्यंत ३ बाद २२४ धावांची मजल मारली. उपाहारानंतर ईशांतच्या स्पेलने सामन्याचे चित्र पालटले. ईशांतने सुरुवातीला थिरिमानेला माघारी परतवले. त्यानंतर पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. त्यानंतर खेळास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या कसोटी सामन्याचा हिरो दिनेश चंडीमलला (११) ईशांतने बाद केले. मॅथ्यूजने कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक ९८ व्या षटकात १६४ चेंडूंमध्ये पूर्ण केले. दरम्यान, शतक साकारल्यानंतर मॅथ्यूजला अधिक वेळ टिकाव धरता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल पहिल्या स्लिपमध्ये तैनात मुरली विजयने टिपला. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी ७४ धावांत चार बळी घेतले. मिश्राने जेहान मुबारकला (२२) बाद केले. पाठोपाठ रंगाना हेराथला आश्विनने तर थारिंडू कौशलला मिश्राने बाद करीत श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला.धावफलकभारत पहिला डाव : ३९३.श्रीलंका पहिला डाव : दिमुथ करुणारत्ने पायचित गो. यादव ०१, कौशल सिल्वा झे. आश्विन गो. मिश्रा ५१, कुमार संगकारा झे. रहाणे गो. आश्विन ३२, लाहिरू थिरिमाने झे. साहा गो. शर्मा ६२, अॅन्जेलो मॅथ्यूज झे. विजय गो. बिन्नी १०२, दिनेश चंडीमल झे. राहुल गो. शर्मा ११, जेहान मुबारक त्रि. गो. मिश्रा २२, धम्मिका प्रसाद झे. रहाणे गो. मिश्रा ०५, रंगाना हेराथ पायचित गो. आश्विन ०१, थारिंडू कौशल यष्टिचित साहा गो. मिश्रा ०६, दुश्मंता चामीरा नाबाद ००. अवांतर (१३). एकूण १०८ षटकांत सर्व बाद ३०६. गोलंदाजी :- ईशांत शर्मा २१-३-६८-२, उमेश यादव १९-५-६७-१, स्टुअर्ट बिन्नी १८-४-४४-१, रवीचंद्रन आश्विन २९-३-७६-२, अमित मिश्रा २१-३-४३-४. भारत दुसरा डाव : मुरली विजय खेळत आहे ३९, के. एल. राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, अजिंक्य रहाणे खेळत आहे २८. अवांतर : (१). एकूण : २९.२ षटकांत १ बाद ७०. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४-०-१२-१, रंगाना हेराथ ११.२-३-२३-०, दुष्मंत चामीरा ४-०-१४-०, अॅन्जेलो मॅथ्यूज २-१-१-०, थारिंंडू कौशल ८-०-२०-०.
भारताची श्रीलंकेवर १५७ धावांची आघाडी
By admin | Published: August 23, 2015 2:22 AM