गोल्ड कोस्ट - भारत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या अभियानाला गुरुवारी सुरूवात करणार आहे. यात सर्व खेळाडूंचे लक्ष्य विश्व विजेती भारोत्तोलक मीराबाई चानु हिच्यावर असेल. ती पदकाची प्रबळ दावेदार आहे. त्यासोबतच बॅडमिंटनपटू आणि बॉक्सर्सवरही भारतीय संघाचे लक्ष असेल.राष्ट्रकुल २०१४ मध्ये रौप्य पदक विजेती मीराबाई चानु ही ४८ किलो गटात पदकाची प्रबळ दावेदार आहे. तिचे सर्वोत्तम प्रदर्शन १९४ किलोचे आहे. जे तिच्या सर्वात कडव्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा १० किलोने जास्त आहे.या स्पर्धेत सहभागी होणारा एकही भारोत्तोलक कधीही १८० किलो पेक्षा जास्त वजन उचलु शकलेला नाही. चानुची स्पर्धा अमांडा ब्राडोक हिच्याशी आहे.त्याचवेळी भारतीय बॅडमिंटनपटू, बॉक्सर आणि महिला हॉकीसंघही आपल्या अभियानाला सुरूवात करणार आहे. गेल्या वेळी पाचव्या स्थानावर राहिलेल्या हॉकी संघाचा सामना वेल्ससोबत होणार आहे. या स्पर्धेच्या आधी भारताने दक्षिण कोरियात मालिका जिंकली आहे. पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांना सोपे ड्रॉ मिळाले आहेत. सायना नेहवालकडून भारतीय संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.बॉक्सिंगमध्ये २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता मनोज कुमार (६९ किलो) उद्या रिंगमध्ये उतरेल. त्याचा पहिला सामना नायजेरियाच्या ओसिता उमेहसोबत होईल. स्क्वॅश कोर्टवर दीपिका पल्लीकल, जोशना चिनाप्पा, सौरव घोषाल अणि हरिंदर पाल संधू गुरुवारी आपल्या अभियानाला सुरूवात करतील. २०१४ मध्ये जोशना आणि दीपिका यांनी दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केली होती आता एकेरीत पदक मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताच्या आशा मीराबाई चानूवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 2:12 AM