ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १६ - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. ७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात भारताच्या विकास क्रिशनचा उझबेकिस्तानच्या बेकतीमीर मेलिकुझीव्हने पराभव केला. मेलिकुझीव्हने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत ३-० असा एकतर्फी विजय मिळवला.
विकासच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. ५६ किलो वजनी गटात शिव थापा, ६४ किलोमध्ये मनोज कुमार यांचा आधीच पराभव झाला होता. हा सामना जिंकून विकासने उपांत्यफेरीत प्रवेश केला असता तर, भारताचे एक पदक निश्चित झाले असते.
पुरुषांमध्ये आतापर्यंत फक्त विजेंदर सिंहने २००८ बिजींग ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. महिलांमध्ये २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये एमसी मेरीकोमने कांस्यपदक मिळवले होते.