नवी दिल्ली : या महिन्यातच भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल, अशी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारताची कसून तयारी सुरू आहे.या विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषवित असलेल्या एआयएफएफने स्पर्धेच्या केवळ ९ महिन्यांआधीच निकोलई अॅडम यांना संघाच्या प्रशिक्षकपदावरून डच्चू दिला होता. १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी शुभंकराच्या अनावरणवेळी पटेल यांनी म्हटले की, ‘आम्ही बायचुंग भुतिया व अभिषेक यांना एका महिन्यासाठी संघासोबत राहण्यास सांगितले आहे. यामुळे नवा प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये ताळमेळ साधण्यास मदत होईल.’ अधिकृत शुभंकरचे झाले अनावरण...१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची रंगत रंगण्यास २३८ दिवस शिल्लक राहिले असताना शुक्रवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर ‘खेलियो’चे अनावरण झाले. एआयएफएफ अध्यक्ष पटेल, केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या शुभंकरचे अनावरण करण्यात आले. या वेळी ‘खेलियो’नामक बिबट्याचे शुभंकर म्हणून अनावरण झाले. चित्त्याप्रमाणे दिसणारा हा बिबट्या दुर्मीळ होत असून, हा प्रामुख्याने हिमालयमधील तलहटी आणि दक्षिण पूर्व आशिया येथे दिसतो.‘खेलियो’ला जगासमोर अधिकृत शुभंकर म्हणून आणणे, जागतिक फुटबॉलमध्ये आमच्यासाठी आणखी एक मोठे पाऊल आहे. भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या प्रचारासाठी खेलियो संपूर्ण देशाचा दौरा करून सर्व देशवासीयांना प्रेरित करेल.- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, एआयएफएफ
याच महिन्यात होईल भारताच्या प्रशिक्षकाची निवड
By admin | Published: February 11, 2017 12:45 AM