ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 24 - हॉकी वर्ल्ड लीगच्या सेमीफायनल सामन्यात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. भारताने 6-1 ने पराभव करत पाकिस्तानला अक्षरक्ष: लोळवलं. या स्पर्धेत भारताने सलग दुस-यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. याआधी साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला 7-1 असे लोळवले होते. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने पाकिस्तानवर वर्चस्व राखलं होतं. भारताने जबरदस्त स्ट्राईक करत पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखली.
भारताकडून रमनदीप सिंह आणि मनदीप सिंह यांनी प्रत्येक दोन गोल केले. तर तलविंदर सिंह आणि हरमनप्रीतने प्रत्येक एक गोल करत संघाचं वर्चस्व कायम राखलं.
हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या ते आठव्या स्थानासाठी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना पार पडला. भारतासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करण्याचं आव्हान होतं.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताला शुक्रवारी १४व्या स्थानावरील मलेशियाविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे भारताला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. स्पर्धेत भारताच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. पराभवानंतर आपल्या सर्व कमजोरी सुधारण्यावर भारतीयांना भर द्यावा लागेल. पाकिस्तानविरुध्द झालेल्या सामन्यात भारताचे पारडे जड होते. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीयांनी पाकिस्तानला ७-१ असे लोळवले असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता.