ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - भारत- न्यूझीलंडदरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला.अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा 6 धावांनी पराभव झाला. या विजयासोबत पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-1 अशी बरोबरी केली. न्यूझीलंडच्या 243 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 49.3 षटकांत 236 धावांवर संपुष्टात आला. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि मनिष पांडे हे महत्वाचे फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून केदार जाधव(41) आणि एमएस धोनी(39) यांनी थोडाफार प्रतिकार केला.
हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांनी 50 चेंडूत 49 धावांची भागीदारी करून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, बोल्टला मारण्याच्या नादात पंड्या बाद झाला, सॅंटनेरने त्याचा झेल पकडला. अखेरच्या षटकांत 10 धावांची आवश्यकता असताना साऊदीने तिसऱ्या चेंडूवर बुमराचा त्रिफळा उडवला आणि न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापुर्वी न्यूझीलंडने शुन्यावर पहिली विकेट गमावल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनने(118) झुंजार शतक फटकावलं.सलामिवीर लेथमने(46) त्याला चांगली साथ दिली. दोघांनी तिस-या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी केली. मात्र, विल्यम्सन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला. शेवटच्या 10 षटकांत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताकडून जसप्रित बुमरा आणि अमित मिश्राने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर केदार जाधव, अक्षर पटेल आणि उमेश यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्यापुर्वी भारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि उमेश यादवने सामन्यातील पहिल्याच ओव्हरच्या दुस-या चेंडूवर मार्टिन गप्टिलची विकेट घेत धोनीचा निर्णय सार्थ ठरवला. त्यानंतर विल्यम्सन आणि लेथमने किवींचा डाव सांभाळला. मात्र, दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. न्यूझीलंडच्या संघात डग ब्रेसवेल, जेम्स निशाम आणि इश सोढीऐवजी ट्रेण्ट बोल्ट, मॅट हेन्री आणि अँटॉन ड़ेव्हसिचचा समावेश करण्यात आला होता.