हांगझोउ : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच २१ सुवर्णपदकांची कमाई करताना गुरुवारपर्यंत एकूण ८६ पदके जिंकली. याआधी भारताने गेल्यावेळच्या जकार्ता आशियाई स्पर्धेत १६ सुवर्णपदके पटकावली होती. ही कामगिरी भारतीयांनी मागे टाकली. गुरुवारी भारतीयांनी तिरंदाजीत दोन, तर स्क्वॉशमध्ये एक अशी तीन सुवर्णपदके पटकावली.
तिरंदाजीत महिला व पुरुष कम्पाउंड संघाने शानदार वर्चस्व राखताना भारतासाठी डबल गोल्डन धमाका केला. पुरुष कम्पाउंड गटात भारताने दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवला. या संघात ओजस देवताळे आणि प्रथमेश जावकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लीकल - हरिंदरपाल सिंग संधू यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण जिंकले, तर सौरव घोषालला पुरुष एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
८६ पदकांची लयलूट
भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ३३ कांस्य अशी एकूण ८६ पदके पटकावली असून, पदकतालिकेतील चौथे स्थान कायम राखले आहे.