इपोह : मलेशियाने सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघावर १-0 गोलने विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय हॉकी संघ सलग दुसऱ्या वर्षी सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मलेशियावर २ गोल फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते. त्याआधी सकाळी ग्रेट ब्रिटनने न्यूझीलंडचा ३-२ गोलने पराभव केला; परंतु भारतीय संघ अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही आणि पराभूत झाला. पाच सामन्यांत ७ गुणांसह भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कांस्यपदकासाठी उद्या प्लेआॅफ लढतीत खेळणार आहे, तर विद्यमान चॅम्पियन आॅस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारताने दोन गोलफरकाने विजय मिळवला असता तर ब्रिटनला कांस्यपदकासाठी खेळावे लागले असते; परंतु मलेशियाने जबरदस्त कामगिरी करताना भारतीय संघाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. आॅस्ट्रेलियाने ९ वेळा सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे, तर ग्रेट ब्रिटन तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळणार आहे. याआधी ब्रिटनने १९९४ मध्ये एकदा विजेतेपद पटकावले होते.भारतीय स्ट्रायकर मलेशियाचा डिफेन्स भेदू शकले नाही, तर दुसरीकडे मलेशियाने भारतीय सर्कलमध्ये सुरुवातीलाच प्रतिहल्ला केला. मलेशियाला नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु भारताच्या व्हिडिओ रेफरलमुळे हा निर्णय बदलला गेला.पहिल्या क्वार्टरमधील सुमार कामगिरीनंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळवले; परंतु भारताचे गोल करण्याचे प्रयत्न मलेशियाचा गोलरक्षक सुब्रमण्यम कुमार याने हाणून पाडले. मलेशियाकडून ५0 व्या मिनिटाला विजयी गोल शाहरील साबान याने केला.तत्पूर्वी, ब्रिटनने त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. ब्रिटनकडून सॅम वाडने नवव्या मिनिटाला, फिल रोपरने ३९ व्या मिनिटाला आणि मार्क ग्लेनहोर्गने ४९ व्या मिनिटाला गोल केले. न्यूझीलंडकडून डोमेनिक न्यूमेनने ३0 व्या मिनिटाला, तर ५८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रसेलने गोल केला.
भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले
By admin | Published: May 06, 2017 12:55 AM