इपोह : आगामी रिओ आॅलिम्पिकची रंगीत तालीम म्हणून अझलन शाह हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. बलाढ्य आणि तब्बल आठ वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या आॅस्टे्रलियाने आक्रमक खेळ करताना भारताचा ५-१ असा दणदणीत पराभव केला. या दारुण पराभवामुळे आॅलिम्पिकसाठी भारताला अजून खूप तयारी करायची असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलेल्या आॅस्टे्रलियाने पाचव्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. या वेळी ब्लेक गोवर्सने सर्व सूत्रे स्वत:कडे घेताना आॅस्टे्रलियाला १-० अशा आघाडीवर नेले. मात्र, भारतानेही या वेळी जोरदार प्रत्युत्तर देताना सुनील व मनदीप यांच्या शानदार चालींच्या जोरावर पेनल्टी कॉर्नर मिळवत बरोबरी साधली. दरम्यान, याप्रसंगी भारताचा रुपिंदर जखमी झाला.यानंतर १०व्या मिनिटाला सुनीलने आॅसी क्षेत्रात जोरदार मुसंडी मारताना गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र त्याला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या १२ मिनिटांपर्यंत भारताने कांगारूंना चांगली लढत दिली. परंतु, यानंतर जागतिक विजेत्या आॅस्टे्रलियाच्या तुफानी खेळापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही. १३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जॅमी ड्वेयरने दिलेल्या पासवर चेंडू अचूकपणे गोलजाळ्यात मारत डेव वेटनने आॅस्टे्रलियाला २-१ असे आघाडीवर नेले. तर २०व्या मिनिटाला एडवर्ट ओकेनडैनने तब्बल १०८ किमी प्रतितासच्या जबरदस्त वेगाने गोल करत आॅसीला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.पुन्हा एकदा जॅमी ड्वेयरने अप्रतिम कामगिरी करताना सायमन ओरकार्डला अचूक पास केला आणि ओरकार्डने संघाला ४-१ अशा आघाडीवर नेले. मध्यंतराला आॅस्टे्रलियाने हीच आघाडी कायम राखत सामना निश्चित केला होता. यानंतर भारतीयांनी आॅस्टे्रलियाच्या क्षेत्रात आक्रमक खेळ केला खरा; मात्र नेमकी गोलपोस्टजवळ चूक झाल्याने त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्याच वेळी ५३व्या मिनिटाला मॅट गोड्सने गोल करताना आॅस्टे्रलियाच्या विजयावर ५-१ असा शिक्का मारला. (वृत्तसंस्था) > भारताच्या महिलांचा जपानविरुद्ध पराभवहेस्टिंग्स : उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध झालेल्या १-३ अशा मोठ्या पराभवामुळे भारताच्या महिला संघाची हाक बे स्पर्धेतील वाटचाल अडचणीत आली आहे. आक्रमक सुरुवात केलेल्या जपानने ५व्याच मिनिटाला गोल करून १-० अशी आघाडी घेतली. यानंतरही जपानी खेळाडूंनी आक्रमक धडाका कायम राखताना सहाव्या व सातव्या मिनिटाला गोल करून ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. या मोठ्या पिछाडीमुळे दबावाखाली आलेल्या भारतीय महिलांनी यानंतर सावध भूमिका घेताना जपानला रोखण्यावर लक्ष केंद्रित केले. १४व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना राणीने भारताची पिछाडी १-३ अशी कमी केली. मात्र, यानंतर एकही गोल करण्यात भारतीयांना यश आले नाही. स्पर्धेतील पुढील क्लासिफिकेशन लढतीत भारतीय महिलांपुढे कॅनडाचे आव्हान असून, हा सामना ९ एप्रिलला होईल.
भारताचा दारुण पराभव
By admin | Published: April 08, 2016 3:20 AM