इपोह : गतवर्षीचा उपविजेता भारतीय संघ २६व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाच्या दृष्टीने मैदानात उतरेल. इंग्लंडविरुद्ध भारताचा पहिला सामना आहे. गतवर्षी भारतीय संघ हा नऊवेळच्या विजेत्या आॅस्ट्रेलिया संघाकडून पराभूत झाला होता. संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी हरमनप्रीत सिंगने प्रमुख भूमिका निभावली होती. त्याने गतवर्षी याच मैदानावर वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. त्याच्या खेळीने सारेच प्रभावित झाले होते. हरमनप्रीत यावर्षी पहिल्यांदाच सामना खेळणाऱ्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा भारतीय संघाला आहे. हरमनप्रीतप्रमाणेच ज्युनिअर विश्वचषक संघाचा कर्णधार हरप्रीत सिंग आणि स्ट्रायकर मनदीप सिंग यांनीही अझलन शाह चषक स्पर्धेद्वारेच वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. यावर्षी डिफेन्डर गुरिंदर सिंग आणि मिडफिल्डर सुमित व मनप्रीत सिंग हे नवे खेळाडू आहेत. भारतीय प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स म्हणाले, ‘हरमनप्रीतने वरिष्ठ स्तरावर ज्या पद्धतीने कामगिरी केली, ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. युवा खेळाडू कोणत्याही दबावाखाली खेळणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले जातील.’जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ हा अझलन शाह चषक स्पर्धेद्वारे मजबूत संघ तयार करण्याच्या उद्देशाने गेला आहे. लंडनमध्ये जूनमध्ये होणाऱ्या विश्व लीग उपांत्य सामन्यात हा संघ चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. ओल्टमन्स व इतर सहकारी हे खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतही सहभागी होणार आहे. आशियाई स्पर्धेत विजेतेपद कायम राखल्यास २०२० साली होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला स्थान मिळेल. वरिष्ठ खेळाडूंना याची जाण आहे. २०२०च्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी संघ निवडण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांना माहिती आहे.अझलन शाह चषक स्पर्धेतील पाचवेळचा विजेता भारतीय संघ या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आॅस्ट्रेलियन संघ शेजारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. भारत पहिला सामना उद्या ब्रिटनसोबत खेळेल. त्यानंतर ३० एप्रिलला न्यूझीलंड, २ मे रोजी आॅस्ट्रेलिया, ३ मे रोजी जपान आणि ५ मे रोजी यजमान मलेशिया संघासोबत सामना खेळेल. अंतिम, तिसऱ्या आणि पाचव्या स्थानासाठीचे सामने ६ मे रोजी खेळले जातील.
अझलन शाह चषक स्पर्धेत विजयासाठी भारताचे प्रयत्न
By admin | Published: April 29, 2017 12:51 AM