चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रंगतदार लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत पाकचा अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने व्यक्त केले. आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात आफ्रिदी म्हणाला, ‘पाकिस्तानी नागरिक या नात्याने माझ्या संघाने सर्वच संघांना पराभूत करावे अशी मनोमन इच्छा आहे. भारतावर विजय तर नोंदवायलाच हवा. पण अलीकडची कामगिरी आणि भारतीय संघातील ताकद पाहता भारताचे पारडे या लढतीत जड असेल.पाकिस्तानी गोलंदाजांना भारताच्या बलाढ्य फलंदाजीपुढे उच्च दर्जाचा मारा करावा लागेल. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय फलंदाजी भक्कम आहे. कोहलीने स्वत: वन डे क्रिकेटमध्ये अविस्मरणीय खेळी केली आहे. २०१२ च्या आशिया चषकात विराटने आमच्याविरुद्ध शतक झळकविले तसेच २०१५ च्या आयसीसी विश्वचषकातही अॅडिलेड सामन्यात विराटने आमच्याविरुद्ध मोठी खेळी केली. माझ्या मते कोहलीला गोलंदाजी करणे आव्हान आहे. पाकिस्तानने कोहलीला लवकर बाद केल्यास भारतीय संघाला कमी धावांवर रोखण्याचे डावपेच यशस्वी होऊ शकतात.’ भारतीय संघाकडे फलंदाजीसारखीच भेदक गोलंदाजी असल्याचे सांगून आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘फलंदाजी ही भारताची पारंपरिक ताकद असली तरी गोलंदाजीदेखील भेदक आहेच. अश्विनसारखा ‘मॅचविनर’ संघात आहे. त्याच्या माऱ्यापुढे सर्वोत्कृष्ट फलंदाज नांगी टाकू शकतात. जडेजा अलीकडे भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण गोलंदाज बनला. इंग्लंडमधील हवामान फिरकीला साथ देणारे नसेलही पण या दोघांकडे फलंदाजांना धावा घेण्यापासून रोखण्याची ताकद आहे. भुवनेश्वर, मोहम्मद शमी, युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह हे वेगवान माऱ्यात तरबेज आहेत.’
पाकविरुद्ध भारतच विजयाचा दावेदार : आफ्रिदी
By admin | Published: June 03, 2017 1:00 AM