लंडन : गेल्या लढतीत यजमान ब्रिटनचा पराभव केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या युवा भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज, सोमवारी बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बेल्जियमविरुद्ध भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, पण २०११ नंतर या युरोपियन संघाने वर्चस्व गाजवले आहे. बेल्जियमने जोहान्सबर्गमध्ये २०११ चॅम्पियन्स चॅलेंजच्या फायनलनंतर जास्तीत जास्त सामन्यांत भारताला पराभूत केले आहे. भारताला त्यानंतर खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांत विजय मिळवता आला. २०१२ (मेलबर्न) आणि २०१४ (भुवनेश्वर) येथे भारताने सरशी साधली होती. दोनदा भारताने बेल्जियमचा पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते. (वृत्तसंस्था)>युवा खेळाडूंचा सुखद धक्का : ओल्टमेन्सचॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत शनिवारी ब्रिटनचा २-१ ने पराभव करणाऱ्या युवा भारतीय संघातील खेळाडूंची भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेन्स यांनी प्रशंसा केली. भारतातर्फे १७ व्या मिनिटाला मनदीपने, तर ३३ व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल नोंदविले. ब्रिटनतर्फे एकमेव गोल अॅश्ले जॅक्सन याने केला. भारताचा बचाव शानदार होता. आॅलिम्पिकपूर्वी जुनिअर खेळाडूंची चाचणी घेण्याच्या उद्देशाने सीनिअर खेळाडूंना विश्रांती देणारे प्रशिक्षक ओल्टमेन्स म्हणाले, ‘आम्ही युवा खेळाडूंची शानदार कामगिरी बघितली. त्यांनी मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.’पहिल्या लढतीत आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीविरुद्ध ३-३ ने बरोबरीवर समाधान मानणाऱ्या भारतीय संघाच्या खात्यावर आता आॅस्ट्रेलियाप्रमाणे समान गुण आहेत.
भारताची लढत आज बेल्जियमशी
By admin | Published: June 13, 2016 6:16 AM