लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंचगंगा नदीघाट सुशोभीकरण विकास आराखडा शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी स्थानिक नागरिकांसमोर सादर केला. नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आराखड्यात घाटांचे आणि नदी परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांकरिता ११०० चौरस फुटांच्या विरंगुळा केंद्रासह गं्रथालय, दीपमाळा, वॉकिंग ट्रॅक यांसह पन्हाळगडासह शहराचे विहंगम दृश्य दिसेल असा उंच सनसेट पॉइंट, ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटला नदीकडील बाजूने दोन टप्प्यांत जोडणारा बगीचा, रिटर्निंग वॉल, आदींचा समावेश आहे. यात संपूर्ण काळ्या दगडाचा वापर केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करून हा आराखडा वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर यांनी तयार केला आहे. हा आराखडा ३०० मीटरचा व २४ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. सादरीकरणानंतर बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, आदी परिसरांतील नागरिकांनी दुधाळी नाल्यासह अन्य नाल्यांचे दूषित पाणी नदीत मिसळते. ते रोखण्यासाठी एस.टी.पी. प्लॅँट कार्यान्वित करावा, पर्यटनानिमित्त येणाऱ्या महिलांकरिता स्वच्छतागृह व चेंजिंग रूमचा विचारही यात व्हावा यासह अन्य सूचनाही केल्या. माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी नागरिकांच्या सूचनांचा आदर करून या विकास आराखड्याची सर्वसंमतीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थितांना दिले. सादरीकरण वास्तुविशारद नील इंद्रजित नागेशकर यांनी केले; तर सा. बां. विभागाचे उपअभियंता बी. एम. उगळे यांनी पुरातत्त्व खात्याची या आराखड्यासाठी मंजुरी घेतल्याचे सांगितले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेविका सरिता मोरे, नगरसेवक अफजल पिरजादे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, बापू लिंगम, सुनील जाधव, आदी उपस्थित होते.
भारताच्या हरिकृष्णाचा शानदार विजय
By admin | Published: July 14, 2017 12:59 AM