Asian Games : भारतीय कुस्ती सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे... भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक आरोपांवरून कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर केलेले आंदोलन, त्यानंतर झालेला पोलिसांचा लाठीमार अन् खेळाडूंची पदक विसर्जित करण्याची भाषा, यामुळे जागतिक स्तरावर भारतीय कुस्तीची मान शरमेने नक्की खाली गेली. कुस्तीपटूंच्या लढ्याला काहीअंशी यश मिळालं आहे आणि आता खेळाडू पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. पण, आता कुस्तीपटूंमध्येच दंगल सुरू झालेली पाहायला मिळतेय. आगामी आशियाई स्पर्धेकरिता बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना ट्रायल शिवाय थेट स्पर्धेत पाठवण्यात येणार असल्याची बातमी आली अन् वाद पुन्हा कोर्टापर्यंत गेला.
२० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू अंतिम पांघल हिने बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांना थेट प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. अंतिम म्हणाली, विनेश फोगाटने मागील एका वर्षात काहीच मोठी कामगिरी केलेली नाही, मग तिला थेट प्रवेश का? राष्ट्रकुल स्पर्धेतही तिच्याविरोधात मी ३-३ बाऊट खेळले होते आणि त्यातही चिटींग झाली होती. आता तिला थेट प्रवेश न देता ट्रायल घ्यायला हवी आणि त्यात कोणत्याच प्रकारची चिटींग नकोय.''