पॅरिस : भारतीय तिरंदाजांनी रविवारी शानदार कामगिरी करताना भारताला तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात सुवर्ण पदक मिळवून दिले. अतनु दास आणि त्याची पत्नी दीपिका कुमारी यांनी मिश्र सांघिक गटात नेदरलँड्सचा ५-३ असा पराभव करत भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले. यानंतर दीपिकाने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात वर्चस्व राखत भारताचे चौथे सुवर्ण पदक पटकावले.
दास आणि दीपिका यांची जोडीला सुरुवातीला जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर या नेदरलँड्सच्या जोडीविरुद्ध ०-२ असे पिछाडीवर पडले होते. यावेळी भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल, असेच दिसत होते. मात्र, यानंतर दास आणि दीपिका यांनी कमालीचे सातत्य राखला थेट सुवर्ण पदकाचा वेध घेतला. या आधी दीपिका, अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला रिकर्व्ह संघाने मेक्सिकोचा ५-१ असा फडशा पाडत सुवर्ण पदकावर कब्जा केला होता. दास आणि दीपिका गेल्यावर्षी ३० जूनला विवाहबद्ध झाले होते. या शानदार विजयानंतर अतनु दास म्हणाला की, ‘हा शानदार अनुभव आहे. आम्ही पहिल्यांदाच एकमेकांसोबत अंतिम फेरीत खेळत होतो आणि आम्ही सोबतीने विजय मिळवला.’
यशाचा खूप आनंद आहे. असे वाटत आहे की आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत. मात्र, मैदानावर आम्ही जोडीदार नसतो, तर अन्य प्रतिस्पर्धीप्रमाणे आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करतो, सहकार्य करतो आणि एकमेकांना पाठिंबा देतो.’ दखल घेण्याची बाब म्हणजे दीपिकाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, तिने पहिल्यांदाच मिश्र प्रकारात सुवर्ण जिंकले आहे. शनिवारी अभिषेक वर्माने कंपाऊड वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते.