मुंबई - परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी एक पत्रक प्रसिद्ध करून दिली आहे. नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमधील १५ वर्षांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली होती. (India's great badminton player Nandu Natekar passed away)
नंदू नाटेकर यांच्या निधनाची माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अत्यंत दु:खद अंतकरणाने आम्ही तुम्हाला माहिती देतो की, आमचे प्रिय वडील नंदू नाटेकर यांचे आज २८ जुलै २०२१ रोजी निधन झाले आहे. सध्या लागू असलेल्या कोरोनाच्या नियमावलीमुळे आम्ही शोकसभेचे आयोजन केलेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तसेच नंदू नाटेकर यांच्यााबाबत काही विचार आणि आठवणी तुम्हाला मांडायच्या असतील तर कृपया nandumnatekar@gmail.com या मेल आय़डीवर ईमेल करा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
१२ मे १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेल्या नंदकुमार नाटेकर यांनी भारताला बॅडमिंटनमध्ये अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले होते. बॅडमिंटनमध्ये भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांनी १९५६ मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तेव्हा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.
नंदू नाटेकर यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली होती. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळी पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. तसेच पाच वेळा मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर कब्जा केला होता.