ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २६ - शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनापाठोपाठ अजिंक्य रहाणेही ४४ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद १८१ अशी बिकट झाली आहे. भारताची मदार आता कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रविंद्र जडेजावर असून धोनी नाबाद ३८ धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचे हेझलवूडच्या गोलंदाजीवर शिखर धवन (४५) मॅक्सवेलकडे झेल देऊन बाद झाला. तर मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने (१) एक सोपा झेल हॅडिनच्या हातात दिला. त्यानंतर ३४ धावांवर खेळणा-या शर्माचा जॉन्सननेच त्रिफळा उडवला. तर फॉकनरच्या गोलंदाजीवर सुरैश रैना ७ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ४४ धावांवर असताना रहाणे बाद झाला. भारताला विजयासाठी ७२ चेंडूंमध्ये १४६ धावांची गरज आहे.
तत्पूर्वी स्मिथ (१०५) व फिंचच्या (८१) शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३२८ धावा केल्या. भारतातर्फे उमेश यादवने ४, मोहित शर्माने २ आणि अश्विनने १ बळी टिपला. सामन्याची चांगली सुरूवात करणा-या ऑस्ट्रेलियाची फलंदाजी स्मिथ बाद झाल्यानंतर गडगडली. मात्र अखेरच्या षटकांत त्यांनी पुन्हा फटकेबाजी करत ३२८ धावा केल्या.
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र तिस-या षटकात वॉर्नर अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मात्र स्टीव्हन स्मिथने (१०५) अॅरॉन फिंचच्या (८१) साथीने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्या दोघांपुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरत होते. मात्र १०५ धावांवर खेळणा-या स्मिथला यादवने बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद १९७ झाली. त्यानंतर २३२ धावसंख्या असताना मॅक्सवेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ फिंचलाही यादवने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती ४० षटकांत ४ बाद २३३ अशी झाली. त्यानंतर कर्णधार मायकेल क्लार्क फलंदाजीला अाल्याने तो पुन्हा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरेल असेल वाटत असतानाच मोहित शर्माने त्याला १० धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ फॉकनर (२१) आणि वॉटसनही (२८) बाद झाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नसून, संघ कायम ठेवला आहे. आजचा सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारण्यास दोन्ही संघ उत्सुक असून प्रेक्षकांना काटें की टक्कर पहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की.
सहा आठवड्यांआधी उभय संघ कसोटी व त्यानंतर तिरंगी मालिकेत परस्परांविरुद्ध खेळले. त्यात मायकेल क्लार्कच्या संघाने भारताला एकही विजय साकार करू दिला नव्हता. क्रिकेटविश्वात ज्याप्रमाणे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका व भारत-पाक यांच्यातील सामन्यांची चर्चा होते तशीच चर्चा गेल्या काही वर्षांपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांची होत आली आहे.