नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या काही महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकली जाणार आहेत.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिकीटविक्रीसाठी एका वेबसाइटशी करार केला आहे. पहिल्या सत्रात बंगळुरू, चेन्नई, मोहाली, कोलकाता व धर्मशाळा येथे होणाऱ्या सामन्यांची तिकीटविक्री केली जाणार आहे. मात्र, यामध्ये भारताचे सामने, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश नाही.या संदर्भात ‘बीसीसीआय’ने सांगितले की, तिकिटांची मागणी आणि पुरवठा यांच्यात समन्वय साधण्यासाठी भारताचे चार सामने, दोन उपांत्य सामने व अंतिम सामन्याची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनीही आॅनलाइन तिकीटविक्रीचे समर्थन केले आहे. ‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेची तिकीटविक्रीही या स्पर्धेपासून होण्याची शक्यता आहे. क्रिकेटला विकसित करण्याच्या अभियानांतर्गत ‘बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक स्पर्धा भारत, तसेच जगभरात लोकप्रिय करण्यासाठी मदत करेल,’ असे ठाकूर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ज्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहायचा आहे, त्यांना योग्य प्रकारे तिकीट देण्याची जबाबदारी आमची आहे.- शशांक मनोहर, अध्यक्ष, आयसीसी
भारताच्या महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरीने
By admin | Published: February 25, 2016 3:52 AM