ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 27 - पहिल्या डावात नाममात्र 32 धावांची आघाडी घेणा-या भारताने ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले आहेत. 31 धावात ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. डेव्हीड वॉर्नरच्या रुपाने 10 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला.
वॉर्नरला (6) धावांवर उमेश यादवने वृद्धीमान सहाकरवी झेलबाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने (17) धावांवर स्मिथच्या यष्टया वाकवल्या. पाठोपाठ मॅट रेनशॉ बाद झाला. उमेश यादवने रेनशॉला (8) धावांवर वृद्धीमान सहाकडे झेल द्यायला भाग पाडला. तिस-या दिवशी सकाळच्या सत्रात भारताने चांगली सुरुवात केली होती. पण रविंद्र जाडेजा (63) बाद होताच भारताचा डाव गडगडला.
भारताचा पहिला डाव 332 धावांवर संपुष्टात आला. भारताने ऑस्ट्रेलियावर 32 धावांची नाममात्र आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा केल्या.
कालच्या 6 बाद 248 वरुन रविंद्र जाडेजा आणि वृद्धीमान सहाने डाव पुढे सुरु केल्यानंतर जाडेजा आत्मविश्वासने फलंदाजी करत होता. दोघेही भारताला सन्मानजनक आघाडी मिळवून देतील असे वाटले होते. पण कमिन्सने (63) धावांवर जाडेजाच्या यष्टया वाकवल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांची तंबूत परतण्याची रांग लागली
भुवनेश्वर कुमार भोपळाही न फोडता तंबूत परतला. ओकेफिच्या गोलंदाजीवर त्याने स्लीपमध्ये स्मिथकडे झेल दिला. वृद्धीमान सहाला (31) कमिन्सने स्मिथकरवी झेलबाद केले. कसोटी पदार्पण करणारा कुलदीप यादवला (7) लेयॉनने बाद केले आणि भारताचा पहिला डाव आटोपला.
रविंद्र जाडेजा आणि सहामध्ये सातव्या विकेटसाठी झालेल्या 96 धावांच्या भागीदारीमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर आघाडी मिळवता आली. रविवारी तिसऱ्या सत्रात ऑफस्पिनर नॅथन लियोनने केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले. भारताने अखेरच्या सत्रात ९५ धावा वसूल केल्या, पण चार महत्त्वाचे बळी गमावले.