आपिया : पाचव्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी कायम ठेवताना स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन सुवर्णपदकांची कमाई करुन भारताच्या खात्यात एकूण पाच पदकांची भर केली.वेटलिफ्टींगमध्ये दीपक लाठेर याने मुलांच्या ६२ किलो वजनी गटातून सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अॅथलेटीक्समध्ये भाला फेक प्रकारात मोहम्मद हादिशने भारताला सुवर्ण कमाई करुन दिली. त्याचवेळी मुलींमध्ये जिस्ना मैथ्यूने ४०० मीटर शर्यतीमध्ये रौप्य तर चंदन बौरीने मुलांच्या ४०० मीटरमध्ये व वेलावन सेंथिलकुमारने मुलांच्या एकेरी स्क्वॉशमध्ये प्रत्येकी कांस्य पदकांची कमाई केली. १५ वर्षीय दीपकने मुलांच्या ६२ किलो वजनीगटाच्या वेटलिफ्टींगमध्ये एकूण २५८ किलोंचे सर्वाधिक वजन उचलताना बाजी मारली. स्नैचमध्ये सर्वाधिक १२० किलो वजन उचलून त्याने स्पर्धा इतिहासात नवा विक्रम देखील नोंदवला. त्याचबरोबर त्याने क्लीन आणि जर्कमध्ये १३८ किलोंचे वजन उचलून सुवर्ण निश्चित केले. ट्रॅक अॅण्ड फिल्डमध्ये दुसऱ्या दिवशी भारतीयांनी तब्बल तीन फायनलमध्ये सहभाग घेताना वैयक्तिक सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. भालाफेकमध्ये मोहम्मद हादिशने ७०.२९ मीटरची जबरदस्त फेक करताना सुवर्ण काबीज केले. दोहा युवा आशियाई स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या हादिशने यावेळी कोणतीही कसर न ठेवता बाजी मारली. त्याचवेळी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मूलमैन याने नोंदवलेल्या ८१.५३ मीटरचा जागतिक विक्रम मोडण्यात यावेळी हादिश थोडक्यात चुकला.दुसऱ्या बाजूला मुलांच्या ४०० मीटरमध्ये बंगालच्या चंदनने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना ४६:९९ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्य पदकाची कमाई केली. तर मुलींमध्ये जिस्नाने सुध्दा सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना ५३.१४ सेकंदाची वेळ देत रौप्य पदक पटकावले. भारताच्या महान अॅथलिट पी. टी. उषा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या दोन्ही धावपटूंनी भारतीयांसाठी यशस्वी कामगिरी केली. (वृत्तसंस्था)स्क्वॉशमध्ये कांस्य....स्क्वॉशमध्ये भारताचे आशास्थान असलेल्या व्ही. सेंथिलकुमारला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी खेळाडू आजारी पडल्याने कोर्टवर उतरु शकला नसल्याने सेंथिलकुमारला कांस्य पदक बहाल करण्यात आले. तामिळाडूच्या सेंथिलकुमारचा कांस्य पदकासाठी सामना पाकिस्तानच्या इसरार अहमद विरुध्द होणार होता. मात्र आजारी पडल्याने तो कोर्टवर उतरु शकला नाही. उपांत्य फेरीमध्ये सेंथिलकुमारला मलेशियाच्या अव्वल मानांकीत एंग ऐन यू यिउ विरुद्ध ७-११, ३-११, ७-११ असा पराभव पत्कारावा लागला होता.भारताचे पाचवे स्थान कायम...दुसऱ्या दिवशी झालेल्या या शानदार कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण ८ पदकांची नोंद झाली असून त्यामध्ये ४ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये भारताने आॅस्टे्रलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलैंड नंतर पाचवे स्थान कायम राखले आहे.
दुसऱ्या दिवशी भारताच्या पदकांचा ‘पंच’
By admin | Published: September 09, 2015 2:29 AM