Asian Games 2023 : आगामी आशियाई स्पर्धेत भारताचा पुरूष आणि महिला फुटबॉल संघ खेळताना दिसणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने परवानगी दिली आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली असून भारतातील फुटबॉल प्रेमींना एक खुशखबर मिळाली आहे. कारण क्रीडा मंत्रालयाच्या नियमांनुसार भारताचे पुरुष आणि महिला फुटबॉल संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकले नव्हते.
दरम्यान, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांनी काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून आगामी आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी मागितली होती. खरं तर फिफाच्या आशियाई फुटबॉल क्रमवारीत भारताच्या संघांचा टॉप-८ मध्ये देखील समावेश नाही. पण, मागील काही कालावधीपासून भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी सुधारत चालली असून हे पाहता क्रीडा मंत्रालयाने विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
सैफ चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंकाअलीकडेच पार पडलेल्या सैफ चॅम्पियनशिपचा किताब पटकावण्यात भारतीय संघाला यश आले. सैफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कुवेत संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत भारतीय शिलेदारांनी स्पर्धेचा किताब उंचावला. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ आशियाई स्पर्धा गाजवणार का हे पाहण्याजोगे असेल. आता पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेत तमाम भारतीयांच्या नजरा कर्णधार सुनील छेत्रीच्या संघावर असतील.