- अयाझ मेमन
भारत विरुद्ध बांगलादेश हा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तसे पाहिले तर या दोन्ही संघांची कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. भारताचा फॉर्म गेल्या काही काळापासून चांगला राहिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्या सामन्यातही भारताने तीनशेपेक्षा जास्त धावा केल्या होत्या आणि फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण यात दोन्ही संघांमध्ये कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. मात्र, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे; उलटफेर होऊ शकतो. आपण पाहिले आहे की, पाकिस्तानला भारताकडून मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. मात्र, तरीही पाकिस्तानने स्पर्धेत पुनरागमन केले आणि स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या खेळात खूप अनिश्चितता आहे. तुम्ही एका दिवशी सर्वात बलवान असाल, मात्र त्याचवेळी दुसरा दिवस तुमच्यासाठी कठीण असतो. त्यामुळे भारताने बांगलादेशला कमकुवत समजू नये. खेळण्याआधीच आपण हा सामना जिंकला आहे, असेही भारताने समजू नये.भारताची रणनीती आणि संघ नेमका कसा असेल, याचा विचार करूया. भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात आर.अश्विनला संधी दिली होती. आफ्रिकेकडे तीन डावखुरे फलंदाज होते. त्यामुळे अश्विनला संधी मिळणे गरजेचेदेखील होते. मात्र, बांगलादेशचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंपेक्षा फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात. तमीम इक्लाब, शाकीब अल हसन हे डावखुरे खेळाडू आहेत. त्यामुळे आॅफ स्पिनरला जागा मिळेल का? हा प्रश्न आहे. मात्र, संघ निवडीसाठी कुंबळे आणि कोहली हे काय योजना करतात, त्यावर अवलंबून आहे. कदाचित उमेश यादवला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. संघात इतर कोणतेही बदल होतील, असे वाटत नाही. सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये आहे. शिखर धवन सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांनीदेखील चांगल्या धावा केल्या आहेत. गोलंदाजीही चांगली होत आहे. जसप्रीत बुमराह यानेदेखील गडी बाद केले. या मैदानावर ३००ची धावसंख्या बनू शकते. जर भारत प्रथम फलंदाजी करत असेल, तर तीनशेच्या आसपास धावसंख्या उभी केली पाहिजे. जर समोरचा संघ तीनशेच्यावर धावा करत असेल, तर तुम्ही अडचणीत आहात. बांगलादेश प्रथम फलंदाजी करत असेल, तर बांगलादेशला २७०च्या पुढे जाऊ देणे भारतासाठी धोक्याचे ठरेल. त्यांच्याकडेदेखील चांगले फलंदाज आहेत. बांगलादेशच्या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही, त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे.
(संपादकीय सल्लागार)