preeti pal video : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंना आलेले अपयश पाहत तमाम भारतीयांना पॅरालिम्पिकमधून पदकांची आशा आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय शिलेदारांनी आपली चमक दाखवली. अवनी लेखराने सुवर्ण पदक जिंकून पदकाचे खाते उघडले. मग मोना अग्रवाल, प्रीती पाल आणि मनीष नरवाल यांनी पदकांची कमाई केली. यातील सर्वात प्रेक्षणीय लढत ठरली ती म्हणजे प्रीती पालची. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या लेकीने कांस्य पदकापर्यंत धाव घेतली. प्रीतीने महिलांच्या १०० मी. धावण्याच्या प्रकारात १४.२१ सेकंदात अंतर गाठून तिसरा क्रमांक पटकावला.
प्रीतीला पहिल्या दोन खेळाडूंना मागे टाकता आले नसली तरी तिने तिची सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या देशाला एक पदक मिळवून दिले. टी३५ प्रकारातील महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत भारताच्या प्रीती पालने १४.२१ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान पटकावले. चीनच्या धावपटूंनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. चीनच्या जिया (१३.३५ सेकंद) आणि गुओने १३.७४ सेकंदात शर्यत पूर्ण अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
खरे तर प्रीती पालने यावर्षी कोबे येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकून थेट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. गतवर्षी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रीतीला कोणतेही पदक जिंकता आले नव्हते. पण, आता तिने कांस्य पदक जिंकून १४० कोटी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.
अवनी लेखराला पुन्हा एकदा गोल्ड अवनी लेखराने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली. सुवर्ण पदकासाठी काही वेळ भारताच्या दोन खेळाडूंमध्ये चुरस झाली. मोना अग्रवाल काही वेळ अव्वल स्थानी राहिली. पण यानंतर कोरियन नेमबाजने पहिला क्रमांक पटकावला. मग अवनी तिसऱ्या क्रमांकावर घसरली होती. मात्र, तिने जबरदस्त पुनरागमन केले. भारताच्या मोनाचा प्रवास २२ शॉट्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर संपला. २४व्या आणि शेवटच्या शॉटमध्ये अवनीने १०.५, तर दक्षिण कोरियाच्या युनरीने ६.८ असा स्कोअर केला. अशा प्रकारे अवनीने सुवर्ण पदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण पदक जिंकता आले. अवनी लेखरा हिने सोनेरी कामगिरी करत तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल एकेरीत सुवर्ण पदक पटकावले.