नवी दिल्ली : पात्रता फेरीद्वारे आॅलिम्पिक तिकीट मिळविण्यात अपयशी ठरलेली भारतीय स्टार महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिचे आॅलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. तिच्यासाठी वाईल्ड कार्डची मागणी करण्याची देशाची तयारी आहे.५१ किलो वजन गटात आव्हान सादर करणारी मेरी कोम मागील महिन्यात अस्ताना येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या दुसऱ्याच फेरीत पराभूत झाली. महिला बॉक्सर्ससाठी ही दुसरी आणि अखेरची पात्रता फेरी होती. या स्पर्धेत मेरी कोम उपांत्य फेरीत पोहोचली असती तरी तिला आॅलिम्पिक खेळता आले असते. भारतीय बॉक्सिंगचे संचालन करणाऱ्या अस्थायी समितीचे प्रमुख किशन नर्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार मेरी कोम शानदार खेळाडू असून या खेळातील तिचे योगदान अतुलनीय आहे. आम्ही तिच्यासाठी वाईल्ड कार्ड मागण्याचा निर्णय घेतला. एआयबीएला आणखी काही निवेदने मिळण्याची शक्यता असून यावर चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.’’पाच वेळेची विश्वचॅम्पियन आणि लंडन आॅलिम्पिकची कांस्यविजेती मेरी कोम हिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, ‘‘पाहूया, काय होते ते.’’ वाईल्ड कार्ड आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या देशांच्या राष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला दिले जाते. महिला बॉक्सिंगच्या ५१, ६० आणि ७३ किलो वजन गटात केवळ एकच वाईल्ड कार्ड उपलब्ध आहे. आॅलिम्पिक बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत भारताचा केवळ एकच बॉक्सर शिवा थापा (५६ किलो) पात्र ठरला आहे. (वृत्तसंस्था)
मेरी कोमसाठी ‘वाईल्ड कार्ड’ मागण्याची भारताची तयारी
By admin | Published: June 02, 2016 2:07 AM