इपोह : अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सोमवारी न्यूझीलंडने भारताला २-१ असे पराभूत केले. न्यूझीलंडचा कर्णधार सिमॉन चाइल्ड व अॅँडी हेवर्ड यांनी गोल केले. भारताकडून आकाशदीप सिंगने एकमेव गोल केला. बचावफळीतील खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी भारत - कोरिया सामना बरोबरीत सुटला होता, तर न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय आहे.भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात आघाडीचा खेळाडू मनदीपसिंग आज मैदानात उतरला नाही. रविवारी कोरियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. सकाळच्या सत्रात येथे मोठा पाऊस झाला. पावसाच्या वातावरणातच सामन्याला सुरुवात झाली. भारताने सुरुवातीला आक्रमक खेळावर भर दिला. दरम्यान, पावसामुळे दहा मिनिटे खेळ थांबवावा लागला. सामन्याच्या दहाव्या मिनिटालाच भारताच्या गुरुबाजने गोल करण्याची चांगली संधी दवडली. त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बाहेर गेला. पूर्वार्धात सुरुवातीला दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. न्यूझीलंडचा कर्णधार सायमन चाईल्ड याने आघाडीला राहून आक्रमणाची जबाबदारी सांभाळली. त्याने रचलेल्या चालीमुळे भारताच्या बचावफळीला मोठी कसरत करावी लागली. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र न्यूझीलंडवर आघाडी घेण्याची सुवर्णसंधी भारतीयांनी दवडली. न्यूझीलंडने भारताचा कित्ता गिरवत २६ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर वाया घालवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाला गोल करता आला नाही. यानंतर न्यूझीलंडने आक्रमक खेळ करत भारतावर दबाव आणला. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच निकिन थिमय्याने दिलेल्या पासवर आकाशदीपला गोल करण्यात अपयश आले. यानंतर भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र यावरही गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला सायमन चाईल्डने गोल करत न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ४३ व्या मिनिटाला भारताच्या आकाशदीप सिंगने रघुनाथने दिलेल्या पासवर गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.
भारताला पराभवाचा धक्का
By admin | Published: April 07, 2015 4:06 AM